राज्य सरकार बरखास्त व्हावे म्हणून हनुमान चालीसा; पोलिसांचा कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 09:28 AM2022-04-30T09:28:26+5:302022-04-30T09:29:00+5:30
महाविकास आघाडीचा भाग असलेली शिवसेनेचे हिंदूंशी वैर आहे आणि हिंदूंना त्यांच्या धर्माचे मोकळेपणाने पालन करणे कठीण आहे
मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि त्याद्वारे महाविकास आघाडी सरकार राज्यपालांद्वारे बरखास्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा कट खा. नवनीत राणा, त्यांचे पती आ. रवी राणा यांनी रचला, अशी माहिती राज्य सरकारने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध करीत मुंबई सत्र न्यायालयाला दिली. शुक्रवारी न्यायालय कामकाजात व्यग्र असल्याने त्यांनी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी ठेवली आहे.
महाविकास आघाडीचा भाग असलेली शिवसेनेचे हिंदूंशी वैर आहे आणि हिंदूंना त्यांच्या धर्माचे मोकळेपणाने पालन करणे कठीण आहे, असे सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्यासाठी हनुमान चालिसेचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. राणा दाम्पत्याने केलेल्या जामीन अर्जावर राज्य सरकारने सादर केलेल्या १८ पानी प्रतिज्ञापत्रात मुंबई पोलिसांनी वरील दावा केला. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची धमकी दिली होती. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्यात यावे, यासाठी हनुमान चालीसा पठणाची योजना करण्यात आली. कायद्याच्या मार्गाने स्थापन केलेल्या सरकारपुढे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडवायची की शेवटी राज्यपालांकडे विद्यमान सरकार बरखास्त करण्याची शिफारस करण्याची वेळ यावी, असा आरोप मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.
खासगी निवासस्थानाबाहेर मालकाच्या परवानगीशिवाय धार्मिक श्लोकाचे पठण करणे म्हणजे अतिक्रमण करण्यासारखे आहे. आरोपी व्यक्तींचे शब्द हे स्पष्टपणे द्वेष किंवा अवहेलना करण्याच्या व सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याच्या हेतूने वापरण्यात आले आहेत. नागरिकांच्या विविध वर्गांमध्ये दुर्भावना आणि शत्रुत्वाच्या भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी, नागरिकांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आणि असमाधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे दावा पोलिसांनी केला आहे.
भाजप महाराष्ट्रातील विद्यमान सरकारकच्या धोरणांना कडाडून विरोध करीत आहे. ते शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका करीत आहेत. काही अपक्ष राजकीय नेतेही असे मुद्दे मांडत असल्याचे पोलिसांनी म्हटले. तपासात असे समोर आले की, आरोपी प्रबळ राजकीय विरोधक आहेत आणि त्यांनी पवित्र स्तोत्र पठणासाठी अतिशय चलाखीने पाऊल उचलले, असे पोलिसांनी म्हटले आहे.
साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची भीती
आरोपी जामिनावर सुटल्यास त्यांचा राजकीय प्रभाव पाहता, ते साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांच्याविरोधात अमरावतीमधून १८ गुन्हे, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सात गुन्हे नोंद झाले आहेत, अशी महिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.