राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बजरंगबली हनुमानाच्या जन्मोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदाचा हा सोहळा बहुसंख्य भाविकांनी सोशल मीडियावर साजरा करण्यातच धन्यता मानली. बऱ्याच जणांनी हनुमानाच्या विविध मूर्तींची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आणि असंख्य नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हनुमानाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
मुंबईतील काही हनुमान मंदिरांंमध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी हनुमानाची पूजा केली. भाविकांसाठी मात्र मंदिरे बंद असल्याने, तमाम हनुमानभक्तांना त्यांच्या शक्तीदायी देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही; परंतु ज्या काही मोजक्या मंदिरांच्या दारांना जाळी आहे; त्याठिकाणी काही भाविकांनी जाऊन जाळीतून हनुमानाचे दर्शन घेत समाधान मानले. काही हनुमानभक्त कलावंत मंडळींनीही हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर या देवतेला वंदन करण्यासाठी सोशल मीडियाचीच कास धरली. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, असे साकडे हनुमानाला घातले.
* गाण्यातून हनुमान वंदन...
हनुमंता, आम्हाला शक्ती दे, अशी विनवणी करत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल केले. ‘भीमरूपी महारुद्रा’ या समर्थांच्या स्तोत्राची मी केलेली रचना सगळ्यांना आवडली. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी हे गाणे चित्रित केले आहे. मात्र, तयार असलेला हा चित्रपट तुमच्यासमोर कधी सादर करता येईल, हे त्या हनुमंतालाच ठाऊक, अशी पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर लिहिली.
---------------------------------------------------------------