शस्त्रक्रियेला परवानगी मिळाल्याने ‘आयुर्वेद’मध्ये खुशी, ‘ॲलोपॅथी’मध्ये गम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:58 AM2020-12-21T06:58:02+5:302020-12-21T06:58:46+5:30

surgery : आयुर्वेदामध्ये पुरातन काळापासूनच शस्त्रक्रियेचा समावेश होता. पूर्वीच्या काळी याच शस्त्रक्रियांच्या आधारे उपचार केले जात असत.

Happiness in ‘Ayurveda’, gum in ‘Allopathy’ as surgery is allowed | शस्त्रक्रियेला परवानगी मिळाल्याने ‘आयुर्वेद’मध्ये खुशी, ‘ॲलोपॅथी’मध्ये गम

शस्त्रक्रियेला परवानगी मिळाल्याने ‘आयुर्वेद’मध्ये खुशी, ‘ॲलोपॅथी’मध्ये गम

googlenewsNext

- ओमकार गावंड

मुंबई : केंद्र शासनाने आणलेल्या नव्या कायद्यानुसार आता आयुर्वेदिक डॉक्टरांनाही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात सर्व स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. या निर्णयामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासोबतच आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. आयुर्वेदामध्ये पुरातन काळापासूनच शस्त्रक्रियेचा समावेश होता. पूर्वीच्या काळी याच शस्त्रक्रियांच्या आधारे उपचार केले जात असत. असे आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु ॲलोपॅथी डॉक्टरांकडून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. हा निर्णय घेताना नॅशनल मेडिकल काऊन्सिलकडून कोणतीही परवानगी न घेतल्याने सर्वसामान्य जनतेची दिशाभूल झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच मॉडर्न मेडिसिनला आयुर्वेदाशी जोडणे हे अत्यंत चूक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे हा निर्णय म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांना खुशी तर ॲलोपॅथी डॉक्टरांना गम असा ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आयुर्वेदिककडून निर्णयाचे स्वागत
आयुर्वेदामध्ये शस्त्रक्रिया या ५ हजार वर्षांपासून पुस्तकांमध्ये लिखित स्वरूपात आहेत. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे. पदव्युत्तर डॉक्टर हे गावखेड्यामध्ये जाण्यासाठी तयार नसतात. अशा वेळेस आयुर्वेदिक डॉक्टर ही कमतरता भरून काढू शकतात. नव्याने रुग्णसेवा करायला हवी.
    - डॉ. उदय कुलकर्णी 

ॲलोपॅथी डॉक्टरांचा निर्णयाला विरोध
आयुर्वेदिक डॉक्टर हे ॲलोपॅथी'चा सराव करतात, यामुळे शाखेत संशोधन होत नाही. याप्रकारे मिक्सोपॅथी करणे योग्य नाही. सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना चांगले उपचार मिळणार नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
        - डॉ. अविनाश भोंडवे 

वैद्यकीय क्षेत्राची सर्वांगाने प्रगती झाली आहे. त्यामुळे पूर्वी जी शस्त्रक्रिया व्हायची ती आत्ता करा असे बोलून चालणार नाही. ॲलोपॅथीचे प्रशिक्षण व आयुर्वेदाचे प्रशिक्षण हे संपूर्णतः वेगळे आहे. ॲलोपॅथीमध्ये सामान्य सर्जनला डोळे, नाक, कान, घसा अथवा इतर भागांची सर्जरी करण्याची परवानगी नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. कारण सर्जरी म्हटले तर रुग्णाच्या जीवाला धोका असतो. मात्र आत्ताच्या निर्णयानुसार सामान्य आयुर्वेदिक डॉक्टरांना या सर्व प्रकारच्या सर्जरी करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय दिशाभूल करणारा आहे.                - डॉ. शिवकुमार उत्तुरे

आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे जणूकाही वैदू किंवा बाबा बुवा असाच आजपर्यंत अनेकांचा समज होता. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे आता आयुर्वेदालाही सुगीचे दिवस येणार आहेत. जखम, हात-पाय मुरगळणे, पाठीचे विकार, किडनीचे आजार, त्वचेचे विकार, कान-नाक-घसा यांवर आयुर्वेदिक उपचार यशस्वी ठरले आहेत. मात्र अनेक वेळेस ॲलोपॅथी डॉक्टरांकडून आयुर्वेदिक उपचारांची चेष्टा उडवली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना काम करण्यास अधिक ऊर्जा मिळाली आहे.
    - डॉ. रूपेश घरत 

नवीन कायद्याचा फायदाच फायदा
हल्ली आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर अधिक जोमाने काम करतील. आयुर्वेदिक शाखेतून शिक्षण घेणाऱ्या व घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा निर्णय अत्यंत चांगला ठरला आहे.

नवीन कायद्याचा तोटा
या नवीन कायद्यामुळे ॲलोपॅथी व आयुर्वेदिक यांची औषधे तसेच शस्त्रक्रिया यांचे मिश्रण होईल. यामुळे सामान्य नागरिकाला डॉक्टर निवडताना व उपचार घेताना गोंधळ निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर ॲलोपॅथीचा सराव करायला लागल्यास आयुर्वेदामधील संशोधन थांबू शकते. यामुळे आयुर्वेदिक शाखेचे नुकसान होईल. असा दावा ॲलोपॅथी डॉक्टरांकडून केला जात आहे.

Web Title: Happiness in ‘Ayurveda’, gum in ‘Allopathy’ as surgery is allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर