Join us

नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंतप्रधान म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 8:39 AM

शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. त्यामुळे, त्यांचा वाढदिवस देशपातळीवर विविध ठिकाणी साजरा केला जातो. त्यातच, महाराष्ट्रात आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. मात्र, यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही. त्यामुळे, शरद पवारांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. मात्र, देशभरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेतून ते केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे. नागपुरात फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून गृहमंत्र्यांना लक्ष करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज त्यांचा वाढदिवस असल्याने राजकीय मतभेद विसरुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार यांना ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिनीही पंतप्रधानांनी शुभेच्छापर ट्विट केलं होतं. आता, शरद पवार यांच्या वाढदिनी ट्विट करत, शरद पवार यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी माझी प्रार्थना, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एक गट भाजपासोबत गेला आहे. तर, दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने मोदी सरकावर टीका केली जाते. मात्र, राजकीय मतभेद बाजुला ठेऊन मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, सरकारच्या भूमिकेविरुद्ध ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सोमवारी त्यांची जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला लक्ष्य केलं. तर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, आज नागपुरात रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा होत आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. या सभेतून शरद पवार पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :नरेंद्र मोदीशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा