Happy Daughter day 2018 - लाडक्या लेकीवरील प्रेम व्यक्त करा, 'क्योंकी बेटियाँ बडी प्यारी होती है'...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 10:43 AM2018-09-23T10:43:31+5:302018-09-23T10:46:50+5:30
आई वडिलांच्या सन्मानार्थ मदर्स डे, फादर्स डे साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या लेकींच्या सन्मानार्थ भारतात सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी डॉटर डे साजरा होतो.
मुंबई - आई-वडिलांकडून आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम केलं जात. त्यामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मात्र, वडिलांच्या मनात मुलींबद्दल प्रेमाचा एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. वडिल आणि मुलीच्या नात्याची एक वेगळीच केमिस्ट्री असते. लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा या केमिस्ट्रीचा झालेला उलगडा सर्वांनाच भावूक करुन जातो, असं हे बाप-लेकीचं नातं एक वेगळ्याच बॉण्डींगने बनलेलं असतं. आज देशभरात डॉटर डे म्हणजे मुलींच्या सन्मानार्थ दिवस साजरा करण्यात येत आहे. मुलीवरील प्रेम आणि तिची काळजी व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.
आई वडिलांच्या सन्मानार्थ मदर्स डे, फादर्स डे साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या लेकींच्या सन्मानार्थ भारतात सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी डॉटर डे साजरा होतो. त्यामुळे यंदा 23 सप्टेंबर 2018 रोजी डॉटर डे साजरा होत आहे. माय-लेकीच्या अन् बाप-लेकीच्या प्रेमाची केमिस्ट्रीवर यादिवशी चर्चा होते. वडिलांचे मुलींवर असणारे प्रेम आणि त्यांची घेतली जाणारी काळजी, या गोष्टींचा उहापोह करुन या दिवसाला साजरे करण्यात येते. आपल्या देशात मुले अन् मुलींमध्ये अनेकदा भेद केला जातो. मुलांच्या तुलनेत मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळेच भारत हा पुरुषप्रधान देश असल्याचे बोलले जाते. मात्र, जनजागृतीमुळे आज देशातील परिस्थिती काही प्रमाणात बदलत आहे. मुलगा-मुलगी एकसमान अशी मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे मुलींनाही मुलांप्रमाणेच समान वागणूक मिळावी, त्यांचे समान अधिकाराची चर्चा व्हावी आणि त्यांच्याप्रती पालकांचे प्रेम व्यक्त व्हावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. काही देशांमध्ये डॉटर डे हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज तुम्हीही आपल्या लाडक्या लेकीला काही भन्नाट गिफ्ट देऊन किंवा तिच्या गोड आठवणींना उजाळा देऊन आजचा डॉटर डे साजरा करु शकतो. कारण, हम साथ साथ है चित्रपटात अलोकनाथ म्हणजेच रामकिशन यांनी म्हटल्याप्रमाणे क्योंकी बेटियाँ बढी प्यारी होती है....!