दिवाळी शुभेच्छा : स्टिकर व्हाया आॅनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:49 AM2018-11-06T06:49:06+5:302018-11-06T06:49:17+5:30
डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करताना, दिवाळीच्या शुभेच्छांचे ही डिजिटायझेशन होत आहे. हटके आणि नावीन्यपूर्ण संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा कालौघात मागे पडली असून, नेटिझन्सनी दिवाळी स्टिकरचा वापर करत, आप्तस्वकीयांसह मित्र-मैत्रिणींना दिवाळी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करताना, दिवाळीच्या शुभेच्छांचे ही डिजिटायझेशन होत आहे. हटके आणि नावीन्यपूर्ण संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा कालौघात मागे पडली असून, नेटिझन्सनी दिवाळी स्टिकरचा वापर करत, आप्तस्वकीयांसह मित्र-मैत्रिणींना दिवाळी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण जानेवारी, २०१८ नुसार, जगातील नागरिकांनी सर्वाधिक डाउनलोड केलेले मोबाइल अॅपच्या क्रमवारीत फेसबुक अव्वल स्थानी कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर व्हॉट्सअॅप या अॅपला समाधान मानावे लागले आहे. भारतात ६३ टक्के मोबाइल वापरकर्ते आहेत. दिवाळीत त्यांना आकर्षित करण्यासाठी अॅप कंपन्यात चढाओढ आहे.
दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅपने नवीन स्टिकर बाजारात आणले आहेत. यात इंग्रजी, हिंदीसह मराठी भाषेतील संदेशाचा देखील समावेश आहे. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज यांचे स्वतंत्र स्टीकर उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅप अपडेट करून हे स्टिकर अॅपवर पाहता येतात.
उत्कृष्ट रंगसंगती, आकर्षक चित्रे, शुभेच्छांचे मनोवेधक सादरीकरण असे दिवाळी स्टिकरचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या स्टिकर्सला नेटिझन्सची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
भारतातील नेटिझन्सचा अंदाज घेतल्यास ६१ टक्के नेटिझन्स रोज इंटरनेट वापरतात. २६ टक्के नेटिझन्स आठवड्यातून एकदा आणि ११ टक्के नेटिझन्स महिन्यातून एकदा इंटरनेटचा वापर करत असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय इंटरनेट सर्वेक्षणानुसार समोर आली आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने दिवाळी शुभेच्छा असलेले ग्रीटिंग कार्ड काळाच्या ओघात मागे पडत असून, दिवाळीनिमित्त स्टिकरचा ट्रेंड सध्या नेटिझन्समध्ये आहे.