निसर्गरम्य वातावरणातील एकत्र सुखी कुटुंब
By Admin | Published: January 22, 2016 02:30 AM2016-01-22T02:30:59+5:302016-01-22T02:30:59+5:30
म्हाडाने २००५ साली गोरेगाव (पूर्व) नागरी निवाराच्या मागील निसर्गरम्य परिसरात मोठी वसाहत उभी केली आहे. वसाहतीमध्ये प्रत्येकी सात मजल्यांच्या एकूण २८ इमारती
मनोहर कुंभेजकर , मुंबई
म्हाडाने २००५ साली गोरेगाव (पूर्व) नागरी निवाराच्या मागील निसर्गरम्य परिसरात मोठी वसाहत उभी केली आहे. वसाहतीमध्ये प्रत्येकी सात मजल्यांच्या एकूण २८ इमारती आणि काही रो हाऊसमध्ये सुमारे २० हजार मराठी आणि अमराठी रहिवासी गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून गुण्यागोविंदाने राहत आहेत.
निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, डोंगरातून वाहणारा धबधबा, काहीच अंतरावर असलेली गोरेगाव चित्रपट नगरी, आरे कॉलनी आणि येथील छोटा काश्मीर ही निसर्गरम्य ठिकाणे वसाहतीला वरदान ठरली आहेत. या परिसरात आल्यावर एका पर्यटनस्थळी आल्याचा आनंद मिळतो. येथील इमारत क्रमांक २ आणि इमारत क्रमांक ३ यांची एकत्रित फेडरेशन असलेली ‘न्यू म्हाडा श्री समर्थ फेडरेशन गृहनिर्माण सहकारी संस्था रहिवाशांसाठी कार्यरत आहे.
फेडरेशनचे शैलेश शेट्ये सांगतात की, इमारत क्रमांक २ आणि ३ मध्ये ७ मजल्यांच्या १० इमारती आहेत. त्यांत २८० भाडेकरू असून रहिवाशांची संख्या एक हजाराच्या घरात आहे.
वसाहतीमधील कचरा जमा करण्यासाठी पाटील यांनी कचरा डबे उपलब्ध करून दिले असून ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण येथे करण्यात येते, असे प्रकाश भालेकर यांनी सांगितले. भविष्यात कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करून त्याचा येथील बगीचासाठी उपयोग केला जाणार आहे. पावसाळ्याचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, मैदानात सोलर लाईट, इमारतींच्या भोवती तारेचे कंपाउंड, सर्व सोसायट्यांचे कन्व्हेअन्स आदी योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभू यांच्या आमदार निधीतून येत्या वर्षात येथील अथर्व सोसायटीलगत सुसज्ज पोलीस चौकी, संपूर्ण म्हाडा वसाहतीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठी पाण्याची टाकी यांची सुविधा येत्या वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर पश्चिम उपनगरातील सुसज्ज उद्यानाचा लोकार्पण सोहळा येत्या मार्चच्या आत होणार असल्याची माहिती शैलेश शेट्ये यांनी दिली.
सर्वधर्मसमभाव!
सर्व धर्मांचे लोक वसाहतीत राहत असल्याने गणेशोत्सव आणि दिवाळीप्रमाणेच ख्रिसमस सेलीब्रेशन आणि नववर्षाचे स्वागतही धडाक्यात केले जाते. २६ जानेवारी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनी सर्वधर्मीय वसाहतीत एकत्र दिसतात. होळी आणि मराठमोळ्या हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठीही सर्व धर्मीय पुढाकार घेतात, असे फेडरेशनचे अध्यक्ष अनिल आचिरणेकर यांनी सांगितले.
सामाजिक जाणिवेचे भान
होळीच्या सणाला संस्कृती जपताना पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी ‘पाणी वाचवा’ हा संदेश देत या ठिकाणी होणाऱ्या ‘रेन डान्स’साठी खास पाण्याचा टँकर फेडरेशनतर्फे उपलब्ध करून दिला जातो. होळी या सणाने येथील सण-उत्सवांची सांगता होते. विशेष म्हणजे सर्व इमारती मिळून फेडरेशनने जमा केलेल्या वार्षिक वर्गणीतूनच येथील सण-उत्सव साजरे केले जातात. येथील १० इमारतींतील नागरिक आपल्या सभासदांसाठी सहलीचेदेखील आयोजन करतात, अशी माहिती फेडरेशनचे सचिव विजय हुंबरे यांनी दिली.
नागरी सुविधांचा पाठपुरावा
पाणीटंचाईमुळे येथील स्थानिक नगरसेविका मनीषा पाटील आणि माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांनी रहिवाशांना बोअरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती खजिनदार दीपक कदम यांनी दिली. तर आमदार सुनील प्रभू यांच्या आमदार निधीतून येथील इमारत क्रमांक २ आणि ३ च्या मोकळ्या जागेत नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान, जॉगिंग ट्रॅक, सभामंडप, मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बाकडे, उद्यानातील झाडांच्या पाण्यासाठी बोअरवेल अशी कामे प्रगतिपथावर आहे, असे नीलेश सामंत यांनी सांगितले.