मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का? असे अनेक सवाल करत दसरा मेळाव्यातील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेने पोस्टरबाजी केली आहे.
मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनसमोर पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? असे विविध सवाल करत मनसेने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा 18 ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा केली होती. तसेच, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, दुष्काळ, दहशतवाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
मनसेकडून शिवसेनेला विचारलेले प्रश्न....महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेती मालाला हमी भाव मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?