जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण पट्ट्याला चकवा देणारा पाऊस शनिवारी बरसला. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने या सरीमध्ये नागरिकांनी भिजण्याचा आनंद घेतला. शनिवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत पावसाने हजेरी लावली. राज्यातही मान्सून सक्रिय झाला असून, मुंबईच्या वेशीवर अलिबागमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.
पुढील ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दुपारपर्यंत हलक्या सरी सुरू होत्या, संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये शनिवारी पावसाने हजेरी लावली. मुंबईत मान्सूनचे आगमन खूपच उशिरा झाले आहे. विपोरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे हवामान खात्याने सांगितले होते.
येथे वाहतूक कोंडी- मान्सूनपूर्व तयारी झाली असल्याचा शासकीय यंत्रणेचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला. दादर, किंग सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचून वाहनांची गती मंदावली होती. दादर ते सायन वाहतूक खूपच संथ होती. वरळी सी लिंक गेटजवळ गफार खान रोड येथे कोंडी झाली होती.- रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या,
पालघर : अनेक ठिकाणी पावसाची वर्दीदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी दुपारी पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आणि उष्णतेने हैराण झालेल्या जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात बहुताश तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने वर्दी दिली. विक्रमगड, डहाणू, पालघर, वसई, तलासरी, आदी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु झाला. तर ग्रामीण भागात सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात गारवाही निर्माण झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संततधारठाणे, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शनिवारी पावसाची संततधार सुरू होती, जिल्ह्यातील इतर भागांतही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्याभरात शनिवारी सरासरी ५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्हाभरात शनिवारपर्यंत सरासरी ३९ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.
नवी मुंबई : संध्याकाळी धुवाँधारगेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने शनिवारी नवी मुंबईत मध्य रेल्वे व पश्चिम दमदार एंट्री केली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण हलकासा गारवा निर्माण झाला होता. परंतु, पाच नंतर मात्र वरुणराजाने दमदार एन्ट्री केली, त्याच्या धुवाँधार आगमनाने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तसेच ऐन संध्याकाळी तो आल्याने फेरीवाल्यांसह कामावरून घरी परतणार्या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातरपिट उडाली होती.
रायगड : बळीराजा सुखावलापावसाने दडी मारल्याने रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईसह खरीप हंगाम धोक्यात आला होता. धूळवाफेवर केलेल्या पेरण्या दुबार करण्याची वेळ आली होती. मात्र, शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, तर शनिवार दिवसभर सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे टंचाईची दाहकता काहीशी कमी होणार असून खरिपाची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या २४ तासांत मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी येथे अडकलेला मान्सून शनिवारी अलिबागपर्यंत आला होता. पुढील चार-पाच दिवसांत महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होईल, त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी अरिंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ४८ तासात मान्सून मुंबईत सक्रिय होणार आहे.- सुषमा नायरशास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग