मुंबई - जगभरात नववर्षाची धूम पाहायला मिळत आहे. 2018 ला निरोप दिल्यानंतर मध्यरात्री 12 पासूनच 2019 च्या स्वागताला सुरुवात झाली. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता, नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्यात येत आहे. भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.
मुंबईकरांच आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आरतीने झाली. नववर्ष मंगलमय, आनंददायी आणि सुखकर जाण्यासाठी सुखकर्ता-दुखहर्ता विघ्नविनायकाच्या चरणी भक्तगण नतमस्तक झाले आहेत. 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतरही गणरायाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यास भक्तांनी गर्दी केल्याचं दिसून येते. नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातून मुंबईत पर्यटक आले आहेत. तर, नववर्षाची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वादाने करण्याचा निश्चय मनाशी करून अनेक पर्यटक व मुंबईकर सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाले आहेत. आज सकाळीच बाप्पांच्या चरणी लीन होऊन विशेष आरताचा लाभ या भक्तजणांनी घेतला. आज, नववर्षानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रयागराज येथे गंगाआरतीने नववर्षाची सुरुवात झाली असून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात हरमंदिर साहिब यांच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली आहे.