हॅप्पी विंटर; नव्या वर्षातही गारवा झोंबणार, तापमानाने चालू हंगामातील गाठला नीचांक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:58 PM2020-12-31T23:58:02+5:302021-01-01T07:04:12+5:30
गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत येथील किमान तापमानात वाढ झाली आहे.
मुंबई : डिसेंबरच्या उत्तरार्धात मुंबईत किमान तापमानाने चालू हंगामातील नीचांक गाठला असून, मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस मुंबईचे किमान तापमान माथेरानपेक्षा एक अंशाने कमी हाेते. परिणामी, मुंबईत माथेरानसारखा गारवा अनुभवता येत असतानाच आता नव्या वर्षातही पुढील १५ दिवस किमान तापमान खाली राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, नव्या वर्षाची सुरुवात ‘हॅप्पी विंटर’ने होईल. जानेवारीच्या उत्तरार्धात मात्र किमान तापमानात वाढ हाेईल.
मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १८.५ अंश नोंदविण्यात आले असून, गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत येथील किमान तापमानात वाढ झाली आहे. १५ अंशावर घसरलेले किमान तापमान आता १८ अंशावर आले असले तरी गारवा कायम आहे. राज्याचा विचार करता गुरुवारी परभणी, सातारा, जळगाव, नांदेड, पुणे, बारामती, जालना, ठाणे, औरंगाबाद, जेऊर, माथेरान, नाशिक, मालेगावचे किमान तापमान बऱ्यापैकी स्थिर असून, वातावरणात गारवा आहे.