फळांचा राजा आंब्यावरही कोरोनाची वक्रदृष्टी, हापूस उत्पादकांना मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:06 PM2020-05-23T18:06:56+5:302020-05-23T18:07:33+5:30
हापूस राज्यात, देशात आणि विदेशात पोहचविण्यात यशस्वी झाले असले तरी कोरोनामुळे आंबा उत्पादकांना ५० टक्के आर्थिक तोटा झाल्याचे गणित बांधले जात आहे.
- देशात कुठे पोहचला आंबा : राजकोट, अहमदाबाद, बडोदा
- विदेशात कुठे पोहचला आंबा : लंडन, आखाती देश
- आंब्याच्या प्रजाती : रत्ना, केसर, पायरी, लंगडा, उत्तर भारतामधला दशरा, दक्षिणेकडचा बदामी
सचिन लुंगसे
मुंबई : संपूर्ण देश कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये आहे. जीवनावश्यक वस्तू मिळणेदेखील कठीण झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्यालादेखील बसला आहे. ऐन आंब्याच्या हंगामात शेतक-यांना आंबा बाजारपेठेत पोहचविणे तापदायक झाले आहे. मात्र तरिही शेतकरी विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोकणाला हापूस राज्यात, देशात आणि विदेशात पोहचविण्यात यशस्वी झाले असले तरी कोरोनामुळे आंबा उत्पादकांना ५० टक्के आर्थिक तोटा झाल्याचे गणित बांधले जात आहे.
कोकणातून हापूस देवगड, राजापूर, रत्नागिरी, वेंगुर्ला, गुहागर, दापोली, श्रीवर्धन आणि अलिबाग येथून मुंबईत दाखल होतो. गेल्या ६० दिवसांचा मुंबईचा विचार करता मुंबईमध्ये दरवर्षी ५० लाख पेटया येतात. पण यावर्षी २५ ते ३० लाख पेटया आल्या. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्केच आंबा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा थेट बाजारात ५ लाख पेटया विकल्या गेल्या. दरवर्षी दलाल आणि उत्तर भारतीय विक्रेते हे आंबा मोठया प्रमाणात मार्केटमध्ये विकतात. पण यावर्षी कोरोनामुळे उत्तर भारतीय आपापल्या घरी निघाल्यामुळे यावर्षी कोकणातील तरुणांनी आणि शेतक-यांनी थेट आंबा विकला. मात्र यावर्षीच्या कोरोना संकटामुळे दरवर्षीच्या तुलनेत शेतक-याला जेवढे पैसे मिळतात; तेवढे पैसे मिळाले नाहीत. किंवा नफा झाला नाही. यावर्षी शेतक-यांना २५ टक्के पण फायदा झाला नाही. सरासरी विचार केला तर ५० टक्के तोटा झाला आहे.
...................
कोरोनाच्या काळात मोबाईलचा वापर वाढला. कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकणने मुंबई आणि पुण्यात आंबे पोहचविण्यासाठी कोकण हापूस अॅपचा आधार घेतला असून, आधूनिक तंत्राद्वारे फळांचा राजा घराघरात दाखल होत आहे. देवगड, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, श्रीवर्धन आणि अलिबाग येथील हापूस ग्राहकांना मिळाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार येथील ग्राहकांना हापूस मिळाला आहे.
- संजय यादवराव, संस्थापक, कोकण भूमी प्रतिष्ठान
...................
मोबाईल अॅप : पुढच्या वर्षीदेखील आंब्यांची ऑनलाईन बुकिंग होईल. मोबाईल अॅपद्वारे लोकांपर्यंत कोकणातील ओरिजनल हापूस आंबे पोहचवले जातील. पुढच्या वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने आंब्याची विक्री केली जाईल.
शेतक-यांना बाजारपेठ मिळाली : कोकणातील शेतक-यांना यावर्षी बाजारपेठ मिळाली. यावर्षी थेट शेतक-यांच्या बागेत आंबे पॅक करत थेट लोकांपर्यंत ते पोहचविण्यात आले. मुळात सर्वात महत्त्वाचे दलालांचा हस्तक्षेप टाळता आला.
देवगड हापूसची राजधानी : मुंबईमध्येच नाही तर जगात हापूस आंब्यालाच जास्त पसंती आहे. कोकणातील देवगडच्या पायरी हापूसला सर्वात अधिक पसंती आहे. कारण आज देवगड ही हापूसची राजधानी ठरली आहे. कारण त्याच्या चवीने आणि रसाळपणामुळे तो जास्त विकला जातो.
...................