नामदेव मोरे
नवी मुंबई : वातावरणातील बदलाचा यंदा आंबा हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत कोकणातून फक्त ३० टक्केच आवक होत आहे. तब्बल ७० टक्क्यांनी आवक घटली असून आंब्याच्या बाजारपेठेवर दक्षिणेतील आंब्याचे वर्चस्व निर्माण झाले आहे. प्रत्येक वर्षी मे महिन्यात सर्वाधिक आवक नोंद होत होती. परंतु, यावर्षी एप्रिलपेक्षा कमी आवक होत असल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.
आंबा हंगामावर प्रत्येक वर्षी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील हापूस आंब्याचे वर्चस्व असायचे. फेब्रुवारीपासून हापूसची नियमित आवक सुरू होते व मे महिन्यात प्रतिदिन ८० ते ८५ पेट्यांची आवक होत होती. यावर्षी मे महिन्यात कोकणातून दिवसाला फक्त २५ ते ३० हजार पेट्यांची आवक होत आहे. गुरुवारी २७,५३९ पेट्यांची आवक झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमधून ५०,३४१ पेट्यांची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये २०१७ च्या हंगामामध्ये सर्वाधिक १ लाख ३१ हजार टन आंब्याची आवक झाली होती. यानंतर २०२२ मध्ये १ लाख १४ हजार २७८ टन आवक झाली होती. यामध्ये ८ लाख टन आवक मे व जून महिन्यातील होती. फेब्रुवारीमधील हिट व थ्रेप्स रोगाची लागण यामुळे यावर्षी कोकणातील हापूसची आवक खूपच कमी झाली आहे. गतवर्षी मे महिन्यात कोकणातून ८० ते ८५ हजार पेट्यांची रोज आवक होत होती. यावर्षी हे प्रमाण २५ ते ३० हजार पेट्या एवढेच आहे. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट