मुंबई : लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक वगळता सर्व वाहतूक बंद आहे. त्यामुळे यंदा कोकणातला आंबा चाखायला मिळेल की नाही, असा प्रश्न आंबाप्रेमींना पडला होता. मात्र आता कोकणचा राजा अशी ख्याती असलेला हापूस आंबा कोकण रेल्वेतून देशभरात दाखल झाला आहे. कोकण रेल्वेच्या विशेष पार्सल गाडीतून मुंबई आणि गुजरातमध्ये हापूस आंब्याची वाहतूक केली आहे. याबरोबरच केरळमधील केळीच्या वेफर्सचा पुरवठा देखील केला आहे.
कोरोनामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा तयार व्हायला लागतो, नेमका याच काळात कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन सुरु झाले. संपूर्ण वाहतुकच बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा झाडावरच राहू दिला होता. मात्र लॉकडाऊन दुसऱ्या टप्प्यात ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. अशावेळी कोकणातला आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वेची विशेष पार्सल गाडी सेवा देत आहे.
लॉकडाऊनमध्ये कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय.याकरिता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो रो व मालगाडीच्या बरोबरच विशेष पार्सल गाड्या चालवल्या जात आहे. या विशेष पार्सल गाड्यामधून हापूस आंब्याची वाहतूक कोकण रेल्वेतून देशभर झाली आहे. केरळमधून केळीचे वेफर्स कोकणात दाखल झाले आहेत. केरळमधून आलेले वेफर्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरविले आहेत. उड्डापी येथून मडगाव येथे तीन टन वेफर्सचा माल उतरविला.
------------------------------
२२ एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते ओखा विशेष पार्सल गाडीतून सुमारे ४८ आंब्याच्या पेट्याची वाहतूक केली. रत्नागिरी स्थानकात दाखल झालेल्या या पार्सल ट्रेनमधून रत्नगिरीचा हापूस आंबा मुंबई, अहमदाबाद येथे पाठवण्यात आला. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांना आंबा राज्यात व राज्याबाहेर पाठविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा निम्याहून कमी दरात आंब्याची वाहतूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर २७ एप्रिल रोजी ओखा ते तिरुअनंतपुरम आणि २९ एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते ओखा दुसरी विशेष पार्सल गाडी धावणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने दिली.
------------------------------