मशीद पुलाच्या पाडकामासाठी घेतलेल्या ‘ब्लॉक’मुळे प्रवासी हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 05:44 AM2018-12-03T05:44:56+5:302018-12-03T05:45:03+5:30
मशीद स्थानकावरील पादचारी पुलाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेतर्फे रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
मुंबई : मशीद स्थानकावरील पादचारी पुलाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेतर्फे रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकच्या कालावधीत भायखळा ते सीएसएमटी दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक बंद होती, तर वडाळा रोड ते सीएसएमटी या मार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वडाळा रोड येथून सीएसएमटी कडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मशीद व सँडहर्स्ट रोड या स्थानकावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मशीद स्थानकातील मध्य रेल्वेचे अप व डाऊन धीमे मार्ग व हार्बर मार्गावरील दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. मशीद व सँडहर्स्ट रोड स्थानकावर लोकल थांबणार नसल्याने प्रवाशांनी भायखळा व वडाळा रोड येथून बेस्टने व टॅक्सीने सीएसएमटी स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. रविवार असल्याने रस्ते मार्गावर नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. मात्र प्रवाशांना रेल्वे स्थानकातून पुन्हा रस्ते मार्गे प्रवास करावा लागल्याने त्यांच्यामधून नाराजी करण्यात येत होती. रस्ते मार्गाने प्रवास करावा लागल्याने रविवार सुटीचा दिवस साधून
कुटुंबियांसोबत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला बºयापैकी कात्री लागली. वडाळा रोड पासून हार्बर मार्गावरुन सीएसएमटीला जाण्यासाठी या कालावधीत कोणतीही रेल्वे सेवा सुरु नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागला.
मध्य रेल्वेतर्फे सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काम लवकर पूर्ण झाल्याने ब्लॉक ४.०६ वाजता रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. २६ नोव्हेंबर पासून या पादचारी पुलाच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून १६ डिसेंबर रोजी पुन्हा याचप्रकारे ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
पादचारी पुलाच्या नुतनीकरणामुळे पादचारी पुलाची प्रवासी वहन क्षमता वाढणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दाटीवाटी करावी लागते. नुतनीकरणानंतर प्रवाशांना सहजपणे ये जा करणे शक्य होणार आहे. नूतनीकरण दरम्यान, या पादचारी पुलाची लँडिंग विद्यमान २.४४ मी वरुन ४.८८ मीटर पर्यंत वाढविली जाईल. २.४४ मीटरच्या जिन्यांची रुंदी ३.६६ मीटरपर्यंत वाढविली जाईल आणि दुस-या बाजूच्या १.८० मीटरच्या पायºयांची रुंदी २.३० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
>प्र्रवाशांच्या प्रतिक्रिया
मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणारे पादचारी पुलाचे नूतनीकरण हे चांगले काम आहे. मात्र, त्या कालावधीत तब्बल ६ तास मशीद व सँडहर्स्ट रोड या दोन प्रमुख स्थानकांवर कोणतीही रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कमीत कमी त्रास होईल अशी व्यवस्था करण्याची गरज आहे.
- समीर कांबळे, प्रवासी
नुतनीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे आम्हाला त्रास झाला. टॅक्सी चालकांच्या मुजोरपणामुळे व हेकेखोरपणामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीमध्ये भर पडली. रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असल्याचे अशा प्रसंगात वारंवार सिध्द होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील मुंबईतील लाखो प्रवाशांचा नेहमी विचार करण्याची गरज आहे.
- कैलास अनमणे, प्रवासी