Join us

रोहित ‘ईडी’कडे, शरद पवार शेजारच्या पक्ष कार्यालयात; आज चौकशी; सुप्रिया सुळे करणार सोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 7:01 AM

१९ जानेवारी रोजी ईडीने रोहित पवार यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिसीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार बुधवारी ईडी कार्यालयात जाणार आहेत. रोहित पवार यांच्यासोबत आत्या खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात जाणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रोहित यांचे आजोबा शरद पवार हे ईडी कार्यालयाजवळ असलेल्या पक्षाच्या कार्यालयात दिवसभर थांबणार आहेत.

१९ जानेवारी रोजी ईडीने रोहित पवार यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. याप्रकरणी ५ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोसह राज्यात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना राज्य बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर पवार यांनी ईडीच्या नोटिसीचा डाव सत्ताधाऱ्यांवर उलटवत स्वत:च चौकशीसाठी ईडी कार्यालयात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ईडीने नोटीस मागे घेत चौकशीस येण्याची गरज नसल्याचा निरोप दिला होता. तसेच पोलिस प्रशासनानेही घरी जाऊन पवार यांनी ईडी कार्यालयात येऊ नये, अशी विनंती केली होती. 

कशामुळे चौकशी?

कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून पैसे उचलले होते. लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच या लिलाव प्रक्रियेत ज्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यातदेखील एकमेकांत झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जाते. बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी जी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती, ती रक्कम त्या कंपनीने बारामती ॲग्रोकडून घेतल्याचा आरोप आहे.

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारअंमलबजावणी संचालनालय