मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही ग्रामीण भागाप्रमाणे विवाहितांचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांच्या दफ्तरी १६७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १३९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण अधिक आहे.
गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांकडे महिलांशी संबंधित दोन हजार ५५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी एक हजार ८१८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
चौघींची आत्महत्या -
नऊ जणींची हुंड्याव्यतिरिक्त विविध कारणांतून हत्या करण्यात आली आहे. तर, नऊ जणींनी अन्य तणावातून टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येच्या आठ गुन्ह्यांत आरोपीवर कारवाई केली. तर, आत्महत्येप्रकरणी नऊ प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले.
मुंबई पोलिसांच्या दफ्तरी ३१६ गुन्हे विकृत वासनेचे-
१) ३१६ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. तर, ३७४ जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. हुंड्यासाठीही महिलांच्या मानसिक, शारीरिक छळ सुरू असून, चार महिन्यांत १६७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून समेट घडवण्याचा प्रयत्न-
१) कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेतात.
२) महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार टिकवण्याचे काम केले जाते. महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे पोलिस उपायुक्त हे प्रभारी असून त्यांच्या अंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश असतो.
३) हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळाप्रकरणी १५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्याच्या त्रासाला कंटाळून चार जणींनी आयुष्य संपविले आहे. तर दोघींचा बळी गेला आहे.
गेल्या वर्षी याच चार महिन्यांत २२८ गुन्हे दाखल-
कक्ष २ हुंडाबळी, संबंधित आत्महत्या, हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत येणारे इतर गुन्हे, तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास, प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी, निपटारा करण्याचे काम करतात.