Join us

कोरोनाच्या काळात बायकोकडून होतोय छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने सर्वांनाच चार भिंतींमध्ये अडकून पडावे लागले. त्यामुळे कुठे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने सर्वांनाच चार भिंतींमध्ये अडकून पडावे लागले. त्यामुळे कुठे पती-पत्नीतील संवाद वाढून नात्याची नाळ घट्ट झाली तर कुठे वाद वाढून दुरावा वाढला. अशात महिलांच्या छळाच्या तक्रारी वाढत असताना, काही पुरुषही बायकोकडून छळ सुरू असल्याचा सूर आळवू लागल्याचे धक्कादायक ‘वास्तव’ पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेच्या हेल्पलाइनवर खणखणणाऱ्या कॉलमधून समोर येत आहे. या हेल्पलाइनवर तक्रारीची खणखण १५ टक्क्यांंनी वाढली आहे.

पुरुषांसाठी काम करणाऱ्या 'वास्तव' संस्थेचे संस्थापक अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हेल्पलाइनवर देशभरातून वर्षाला ८० ते ९० हजार कॉल येत आहेत. कोरोनाच्या काळात या कॉलचे प्रमाण १५ टक्क्यांंनी वाढले. कोरोनामुळे बेरोजगारी, घरच्या तसेच विविध जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्यामुळे नैराश्येत असलेला पुरुष पत्नीच्या छळामुळे आणखीन तणावात जात आहे. पती-पत्नीतील वाद वाढत आहे.

यात शहराबरोबर खेडेगावातून छळ होत असल्याच्या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून वाद घालणे, अनैतिक संबंधामुळे पतीसोबत वाद घालणे किंवा लग्नाच्या काही महिन्यांतच प्रियकरासोबत पळून जात, पतीविरोधातच खोट्या तक्रारी करणे तसेच पैशांसाठी तगादा लावण्याचे प्रकार वाढत आहेत. याला कुठेतरी रोख लावणे गरजेचे आहे. धक्कादायक बाब म्हणजे वर्षाला देशभरात ३० हजार महिलांमागे ९० हजार पुरुष आत्महत्या करतात. यात ६२ हजार विवाहित पुरुषांचा समावेश असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.

...म्हणून तो दोन आठवडे कारमध्येच झोपला

पत्नीसोबत सुरू असलेल्या रोजच्या वादाला कंटाळून मुंबईतील एक तरुण दोन आठवडे कारमध्येच झोपला होता. संस्थेकडून मदत मागितल्यानंतर त्याचे समुपदेशन केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते.

पुरुषांसाठीही हवा कठोर कायदा

जसे महिलांसाठी कायद्यात तरतूद आहे, तसेच पुरुषांच्याही न्यायासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचे अमित देशपांडे यांनी सांगितले.

पत्नी मारहाणही करते

कॉलेजमध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातूनच दोघे विवाह बंधनात अडकलो. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नीच्या संशयी वृत्तीमुळे खटके उडायला लागले. यातच तिने मारहाणही सुरू केली. घटस्फोटाची मागणी करताच तिथेही अपेक्षांचा डोंगर मांडला. अखेर, कर्ज काढून तिला पैसे पुरवून घटस्फोट घेत सुटका केली.

- पीडित पती

पुरुषांचेही कोणीतरी ऐकणारे हवे

अनेकदा बदनामीच्या भीतीने पुरुष पुढे येत नाहीत. पीडित पुरुषांचेही कोणीतरी ऐकणारे हवे. म्हणून संस्थेकडून त्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना मार्गदर्शन करत आहे. पुरुषांसाठी कोणी फंड देत नाही. अशात, संस्थेत काम करणारी मंडळी स्वतःच्या पगारातील रकमेतून पुरुषांच्या हक्कासाठी लढत आहे.