सोशल मीडियावरही महिलांचा छळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:10+5:302021-07-28T04:06:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात सोशल मीडियावरील वावर वाढला. त्यात सायबर गुन्ह्याच्या संकटात भर पडली. घरातली प्रत्येक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात सोशल मीडियावरील वावर वाढला. त्यात सायबर गुन्ह्याच्या संकटात भर पडली. घरातली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर होऊ लागली. याचाच फायदा सायबर भामटे घेताना दिसत आहे. यातच, महिलांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसत आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांवर टिनेजरपासून तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठांचाही वावर वाढतोय. त्यात आपले फोटो, माहिती सहजपणे शेअर केली जाते. सोशल मीडियावरील मोकळेपणाच ही मंडळी हेरतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद म्हणून ‘हाय’ जरी केले, तरी ती आपल्याला लाइक्स करते. असा समज बनला आहे. त्यातूनच त्याचा सोशल मीडियावर स्टॉकिंग म्हणजेच पाठलाग सुरू होतो. वारंवार मेसेज करणे. त्याला फोटो, व्हिडीओ शेअर करून भेटण्यास बोलावणे. एकमेकांना मैत्री, प्रेमात शेअर केलेले व्हिडीओ, फोटो मॉर्फ करणे. आणि त्यातूनच तिचा नकार आलाच तर पुढे ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार सुरू होतात. गेल्या काही दिवसात असे प्रकार वाढले असून ही चिंतेची बाब आहे.
त्यामुळे अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तिची खातरजमा करा. आपली माहिती, फोटो शेअर करू नका. नेहमी सतर्क राहा. तसेच असा गुन्हा करणाऱ्यांनी कोठडीत जाण्यापूर्वी वेळीच सावध राहा. आमची नजर तुमच्यावर आहेच, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियाकडे आलेल्या तक्रारी
प्रकार २०२१ २०२० २०१९ २०१८
अश्लील एसएमएस ११२ ९७ २६२ २९५
फेक सोशल, ईमेल, एसएमएस २६ १५ ६५ ४६
अशा प्रकारे होतो छळ
- फोटो मॉर्फ करून बदनामीची भीती
- अश्लील व्हिडीओ, मेल, एसएमएस पाठविणे
- सोशल मीडियावर पाठलाग करणे
- विवाह संकेतस्थळावरून फसवणूक
* अशी घ्या काळजी
सोशल मीडियावर गोपनीय माहिती शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीची मैत्री टाळा. कोणी आपला पाठलाग करत असल्यास थेट जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
* बदनामीची भीती
बदनामीच्या भीतीने अनेक महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही. सायबर भामटे याच गोष्टीचा फायदा घेताना दिसत आहेत.