हार्बरकरांना बारा डब्याची ‘प्रतीक्षाच’
By admin | Published: March 27, 2015 12:49 AM2015-03-27T00:49:42+5:302015-03-27T00:49:42+5:30
मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा करण्यात आल्या. तर पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनही पूर्ण करण्यात आले.
मुंबई : हार्बरवर बारा डबा लोकलसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येत आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असतानाच बारा डबासाठी १५३ डबे आणि डीसी-एसी परिवर्तनाचीही गरज असून या सर्व कामांना विलंब लागणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. त्यामुळे हार्बरवर बारा डबासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा करण्यात आल्या. तर पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनही पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरही सीएसटी ते ठाणे डीसी-एसी परिवर्तन पूर्ण करण्यात आले असून फक्त नियमितपणे सुरु करण्यासाठी अखेरची मंजुरी बाकी आहे. मात्र या सर्वांपासून हार्बर अजूनही बरेच दूर असून बारा डबा लोकल, डीसी-एसी परावर्तन करण्यासाठी ठोस अशा हालचाली किंवा योजना होताना दिसत नाहीत. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे ६0 टक्केच काम पूर्ण झाले असून वडाळा आणि सीएसटी स्थानकात होणाऱ्या विस्तारीकरणाच्या कामाला विलंब लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) केले जात असून वडाळा स्थानकात सध्या काम सुरु आहे. मात्र ते कधी होईल, याची माहीती अधिकारी देत नाहीत. सीएसटीतील हार्बर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरण जानेवारी किंवा फेब्रुवारी ब्लॉक घेवून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र वडाळ््यातील काम झाल्याशिवाय ते हातात घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
हार्बरवर बारा डबासाठी वडाळ््यात काम सुरु असून सीएसटीत मोठे काम केले जाणार आहे. हे काम करण्यास थोडा अवधी लागत आहे ही खरी बाब आहे. त्याचप्रमाणे हार्बरसाठी १५३ डब्यांचीही गरज आहे. महत्वाची बाब म्हणजे हार्बरवर डीसी-एसी परिवर्तन केल जाणार असून हे काम केल्याशिवाय बारा डबा लोकल धावणार नाहीत.
- प्रभात सहाय, एमआरव्हीसी- व्यवस्थापकीय संचालक
हार्बरवर डीसी-एसी परावर्तन
हार्बरवरही १,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट ते २५000 अल्टरनेट करंटचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असून ते पूर्ण केल्याशिवाय बारा डबा लोकल सुरु केल्या जाणार नाहीत, असे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले.
१५३ डब्यांचे टेन्शन : मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर, ट्रान्स हार्बर लाईनवर एकूण १२१ लोकल धावतात. यामध्ये ७५ मेन लाईनवर, ३६ हार्बरवर तर १0 ट्रान्स हार्बरवर धावत असल्याचे सांगण्यात आले. यातील हार्बरच्या लोकलसाठी १0८ डबे जरी लागणार असले तरी प्रत्यक्षात अन्य डबे सायडिंगला ठेवण्यात येणार असल्याने एकूण १५३ डब्यांची गरज असल्याचे सांगण्यात आले. हे डबे आणणार कोठून असा प्रश्न एमआरव्हीसीला आहे.