Join us  

मेगाब्लॉकनंतरही ‘हार्बर’ब्लॉक

By admin | Published: January 25, 2016 2:41 AM

मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच हार्बर मार्गावरही नेहमीप्रमाणे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र सायंकाळी ब्लॉक संपल्यानंतरही हार्बरवरील लोकल रात्री ८ वाजेपर्यंत उशिराने धावत होत्या.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच हार्बर मार्गावरही नेहमीप्रमाणे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत असलेला ब्लॉक संपल्यानंतरही हार्बरवरील लोकल रात्री ८ वाजेपर्यंत उशिराने धावत होत्या.मध्य रेल्वेच्या हार्बरवरील मशीद ते चुनाभट्टी, वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेऊन तांत्रिक काम केले जात होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणाऱ्या या ब्लॉकमुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल तर सीएसटी ते वांद्रे, अंधेरीदरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ५नंतरही हार्बरवरून प्रवास करण्यासाठी स्थानकांवर आलेल्या प्रवाशांना तब्बल अर्धा ते पाऊण तास लोकलची वाट पाहावी लागली. रात्री ८ वाजेपर्यंत हार्बरवरील प्रवाशांचे हे हाल सुरूच होते. याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंह यांना विचारले असता, असे काही घडल्याचे अद्याप तरी माहीत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावरही ब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावरही लोकल १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना हाल सोसावे लागले. >>>> दोन मोटरमन बडतर्फमुंबई : चर्चगेट स्थानकात जलद लोकल बफरला धडकून मोठा अपघात झाल्याची घटना जून २०१५ मध्ये घडली होती. या प्रकरणी झालेल्या चौकशीत सत्य लपविणारा अपघातग्रस्त लोकल चालविणारा लक्ष्मी शंकर तिवारी आणि दुसरा सहकारी मोटरमन सिराज अहमद या दोघांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेन्द्र कुमार यांनी सांगितले.या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले होते. या घटनेबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी होईपर्यंत रेल्वेकडून संबंधित दोन मोटरमना निलंबित करण्यात आले होते. अपघात झाला त्यावेळी चर्चगेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकलचा वेग ताशी ३६ किमी एवढा होता आणि बफरला धडकतेवेळी तो ताशी २९ किलोमीटर असल्याचे समोर आले. या घटनेत ओव्हरहेड वायर, प्लॅटफॉर्म व बफरचे नुकसानही झाले होते. मोटरमनने वेळीच ब्रेक न लावल्यानेही अपघात झाल्याचे समोर आले आहे.