सीएसटीवरील हार्बर तीन दिवस बंद
By admin | Published: January 29, 2016 02:18 AM2016-01-29T02:18:05+5:302016-01-29T02:18:05+5:30
बारा डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सीएसटी स्थानकाच्या हार्बरवर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. १२ ते १४ फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक
मुंबई : बारा डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सीएसटी स्थानकाच्या हार्बरवर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. १२ ते १४ फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, या दरम्यान सीएसटी स्थानकातील हार्बर सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर बारा डब्यांची लोकल धावत असतानाच, हार्बर मार्ग मात्र यापासून वंचित राहिला. त्यामुळे बारा डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेत, हार्बरवरील नऊ डबा असलेल्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू केले. हे काम एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. यातील महत्त्वाच्या असलेल्या वडाळा आणि सीएसटी स्थानकातील हार्बर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामाचे एमआरव्हीसीसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
एमआरव्हीसीकडून सीएसटी स्थानकात हार्बरच्या प्लॅटफॉर्मचे काम आता १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी ७२ तासांसाठी विशेष ब्लॉक घेऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सीएसटी ते वडाळा दरम्यान लोकलसेवा बंद ठेवण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्लामार्गे हार्बरचे प्रवासी सीएसटी गाठू शकतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढविताना रुळांची जागा बदलण्यात येणार आहे. मस्जिद स्थानकाच्या दिशेने लोकलसाठी असलेली एक स्टेबलिंग लाइन काढून, त्या जागी क्रॉसओव्हर्स बसविण्याचे काम केले जाईल. त्याचप्रमाणे, अन्य तांत्रिक कामेही केली जातील.