गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार रखडला
By admin | Published: August 3, 2015 01:33 AM2015-08-03T01:33:08+5:302015-08-03T01:33:08+5:30
पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात येणार आहे. हा विस्तार आता मे २0१५ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट होते
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात येणार आहे. हा विस्तार आता मे २0१५ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा विस्तार होण्यास आणखी सहा ते आठ महिने लागतील, असे एमआरव्हीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या दरम्यान ओशिवरा हे नविन स्थानकाही बांधण्यात येणार असून विस्तार पूर्ण झाल्यानंतरच ते प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
सध्या सीएसटी ते अंधेरीपर्यंतच हार्बर रेल्वे असून त्याचा गोरेगावपर्यंत एमआरव्हीसीमार्फत(मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयुटीपी-२ अंतर्गत विस्तार करण्यात येणार आहे. या स्थानकादरम्यान रेल्वे रुळांच्या बाजूला संरक्षक भिंती, तसेच पुलांचे रुंदणीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकावर हार्बर मार्गाला लागणाऱ्या स्टेशन इमारतीचेही काम केले जात आहे. मार्च २०१४ पर्यंत गोरेगावपर्यंत विस्तार पूर्ण केला जाणार होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा विस्तार रखडत गेला. मार्च २0१४ पर्यंत हार्बरचा विस्तार करण्याची योजना असतानाच या कामाला अर्थसहाय्य मिळण्यास उशिर लागल्याने आणि अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने हा विस्तार कधी होईल हे निश्चित नव्हते. त्यानंतर हा प्रकल्प मे २0१५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान ओशिवरा नवीन स्थानक बनविण्याचे कामही केले जात आहे. या स्थानकादरम्यान एक लेव्हल क्रॉसिंग गेट असून ते बंद करुन पादचारी पुल बनवण्याची एमआरव्हीसीची योजना होती. मात्र पालिकेच्या अखत्यारित पादचारी पुल बनवण्याची जागा येत असल्याने हे काम पालिकेचे होते. त्यामुळे पश्चिम रेल्वे आणि पालिका प्रशासनात पादचारी पुल बांधण्यावरुन झालेल्या वादाचा फटका बसला आणि ओशिवरा स्थानकाचे रखडले. त्याचा परिणाम गोरेगावपर्यंत होत असलेल्या कामावरही होत गेला. त्यामुळे मे २0१५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेला विस्ताराच्या प्रकल्पास आणखी सहा ते आठ महिने लागणार असल्याचे सांगण्यात आले.