मुंबई : प्रलंबित असलेल्या हार्बर मार्गाच्या गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या मार्गावरून लोकल चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. यामुळे आता प्रत्यक्ष लोकल सुरू करण्यासाठी केवळ रेल्वे सुरक्षा आयोगाची (सीआरएस) मंजुरी आवश्यक आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याची मंजुरी मिळेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकूल जैन यांनी दिली. यामुळे जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत हार्बर गोरेगावपर्यंत सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी-२ अंतर्गत हार्बर विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे ३१४ कोटी खर्च आल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वे अधिकारी आणि एमआरव्हीसी यांनी एकत्रित या मार्गावर लोकल चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या स्थानकामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव आणि गोरेगाव ते पनवेल असा थेट प्रवास करणे प्रवाशांना शक्य होणार आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास अंधेरी, दादर स्थानकांवरील प्रवासी ताण काही अंशी कमी होणार आहे.या मार्गावर लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेदेखील सज्ज आहे. सुरुवातीला ३ रेक (१२ बोगी) या मार्गावर धावणार आहेत. तसेच सीएसएमटी-अंधेरी लोकलचा देखील विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ सीआरएस मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती रेल्वे प्रशासन देत आहे.
हार्बर गोरेगाव लोकल चाचणी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:04 AM