Join us

हार्बर, मरेवर प्रवाशांचे मेगाहाल

By admin | Published: October 26, 2015 2:52 AM

वडाळा येथील तांत्रिक कामांसाठी रविवारी हार्बर मार्गावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आलेला मेगाब्लॉक तब्बल दोन तासांनी वाढल्याने हार्बरवासीयांचे मेगाहाल झाले.

मुंबई : वडाळा येथील तांत्रिक कामांसाठी रविवारी हार्बर मार्गावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आलेला मेगाब्लॉक तब्बल दोन तासांनी वाढल्याने हार्बरवासीयांचे मेगाहाल झाले. हार्बरवासीयांना हाल सोसावे लागत असतानाच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील प्रवाशांनाही ब्लॉकनंतर वेगळ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ब्लॉक संपल्यानंतर संध्याकाळी विक्रोळी स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याची घटना घडली आणि या मार्गावरील प्रवाशांनाही गर्दीची झळ बसली. वडाळा येथे क्रॉसओव्हरची जागा बदलण्याचे काम आणि अन्य तांत्रिक कामांसाठी हार्बरवर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक दरम्यान या मार्गावरील लोकल रद्द करतानाच पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. ब्लॉक पाच वाजेपर्यंत संपणे अपेक्षित असतानाच तो संध्याकाळी सात वाजता संपला. त्यामुळे हार्बरवासियांना मोठ्या मनस्तापालाच सामोरे जावे लागले. सीएसटी ते वाशी, पनवेल, सीएसटी ते बान्द्रा आणि अंधेरी ते पनवेल मार्गावरील लोकल प्रचंड उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागले. लोकलमध्ये शिरण्यासाठी तर अक्षरश: धक्काबुक्की होत होती. काही जण लोकलच्या टपावर चढून प्रवास करत होते. महिला आणि वृध्द प्रवाशांचे तर गर्दीमुळे हाल झाले. ब्लॉक उशिरापर्यंत सुरु राहिल्याने २५ पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहीती देण्यात आली. हार्बरवासियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असतानाच मेन लाईन प्रवाशांचीही अशीच काहीशी परिस्थीती निर्माण झाली. मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. हे काम संपल्यानंतर संध्याकाळी ५.३८ च्या सुमारास विक्रोळी अप (सीएसटी दिशेने) जलद मार्गावर रुळाला तडा गेल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. साधारपणे अर्धा तासानंतर रुळाची दुरुस्ती करण्यात आली आणि मार्ग पुर्ववत करण्यात आला. तोपर्यंत सीएसटीकडे येणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल उशिराने धावू लागल्या. रात्री आठ वाजेपर्यंत मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांना गर्दीचे चित्र होते.