मुंबई, दि. 21 -हार्बर रेल्वेवरील वाहतूक सेवा पूर्वपदावर आली आहे. सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. कुर्ल्याजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल 25 मिनिटे उशिरा सुरू होत्या. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवासी संतप्त झाले होते. पाऊस थांबल्यानंतरही लोकल वेळेत उपलब्ध होत नसल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर स्थानकात रेल रोको केला.
गुरुवारी 9.15 वाजता एकही चेंबूर-सीएसटी लोकल न सोडल्यानं प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यात हा खोळंबा होण्यापूर्वी अप मार्गावर लोकल उपलब्ध नसल्याने प्रवासी त्रस्त होते. सानपाडा स्थानकातून सीएसटीकडे जाणारी एकही लोकल जवळपास 40 मिनिटांत धावली नाही. यामुळे राग अनावर झालेल्या प्रवाशांनी चेंबूर स्थानकातच रेल रोको केला. या सर्व घटनांमुळे प्रवाशांची सहनशक्ती संपली आणि त्यांच्या रागाचा उद्रेक झाला. दरम्यान, 10.25 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी संतप्त प्रवाशांची समजूत काढली. यानंतर अप व डाऊन मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.