ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ ओव्हर हेड वायर तुटल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे सीएसटीकडे जाणा-या वाहतूक कोलमडली आहे. दरम्यान तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचे वृत्त मिळत आहे. बिघाड जरी दुरुस्त करण्यात आला तरीही वाहतुकीवर परिणाम कायम आहे.
ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या खोळंब्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे.
ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा घटना कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत.
कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हहेड वायर तुटणे तर, कधी सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांशवेळा हा बिघाड सकाळच्यावेळी होतो. त्यामुळे घरातून वेळेत बाहेर पडूनही प्रवाशांना वेळेत कार्यालय गाठता येत नाही.