मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अप-डाऊन मार्ग पूर्णतः बंद आहे. एकामागे एक ट्रेन उभ्या असल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, ट्रॅक दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या खोळंब्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेला हा खोळंबा दुपारी झाली तरीही दुरुस्त न झाल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कधी गेला रेल्वे रुळाला तडा?
6.20 वाजताच्या ठाण्याकडे जाणा-या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रसंगावधान दाखवत या मोटरमननं वेळीच लोकल थांबवली व रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. दरम्यान, रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक खोळंबली आहे. यामुळे पनवेल स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.