गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेचा विस्तार वेगात

By admin | Published: January 17, 2017 02:39 AM2017-01-17T02:39:37+5:302017-01-17T06:22:43+5:30

हार्बरवरील सीएसटी ते अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याच्या कामांना वेग आला आहे.

Harbor rail expansion to Goregaon | गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेचा विस्तार वेगात

गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेचा विस्तार वेगात

Next


मुंबई : हार्बरवरील सीएसटी ते अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याच्या कामांना वेग आला आहे. या प्रकल्पात फक्त जोगेश्वरी स्थानकाचे महत्त्वाचे काम बाकी असून एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) हे काम पूर्ण करण्यावर अधिक भर दिला आहे. गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचे काम मार्च किंवा एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवले आहे.
मध्य रेल्वेवरील हार्बर मार्ग सध्या सीएसटी ते वाशी, पनवेल तसेच अंधेरीपर्यंत आहे. यातील अंधेरी मार्गाचा विस्तार एमयूटीपी-२ अंतर्गत गोरेगावपर्यंत केला जात असून एमआरव्हीसीकडून हे काम मार्च २0१७ पर्यंत पूर्ण केले जाईल. या प्रकल्पाचा खर्च १४८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. काम पूर्ण होताच सीएसटी ते गोरेगावपर्यंत लोकल धावण्यास सुरुवात होईल. तत्पूर्वी विस्ताराच्या कामात असलेला काही बांधकामांचा अडथळा दूर करण्यात एमआरव्हीसीला यश आले आहे. अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान १२ ते १४ अतिक्रमणे ट्रॅकजवळच होती. यामुळे विस्तार होण्यास अडचणी येत होत्या. ही अतिक्रमणे हटवण्यात आली असून त्यामुळे कामांना गती मिळाली आहे.
अंधेरी आणि गोरेगाव या स्थानकातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार झाल्यास पश्चिम रेल्वेनंतर हार्बरच्या प्रवाशांनाही राम मंदिर हे स्थानक उपलब्ध होईल. एकंदरीतच सध्या जोगेश्वरी स्थानकातील कामे करण्यावर एमआरव्हीसीकडून भर देण्यात आला आहे. जोगेश्वरी पश्चिम दिशेला ‘होम प्लॅटफॉर्म’आहे आणि हार्बरच्या दोन नवीन मार्गासाठी होम प्लॅटफॉर्म तोडावा लागेल. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक एकचाही विस्तार केला जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली. ही सर्व कामे करतानाच अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगाव स्थानकातील काही छोटी कामेही पूर्ण केली जात आहेत. (प्रतिनिधी)
>हार्बर गोरेगावपर्यंतच
गोरेगावनंतर हार्बरचा विस्तार बोरीवलीपर्यंत करण्याचाही प्रस्ताव होता. मात्र बहुचर्चित असा वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प होणार असल्याने या मार्गावरील लोकलचा ताण बराचसा कमी होण्यास मदत मिळेल. त्यातच एलिव्हेटेड प्रकल्पाचा असणारा खर्च पाहता एमआरव्हीसीने हार्बरचा बोरीवलीपर्यंतच्या विस्ताराचा प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतला आणि एमयूटीपी- ३ मधून हा प्रकल्प काढण्यात आला आहे.
सध्या विस्तारातील जोगेश्वरी स्थानकामधील कामे पूर्ण केली जात आहेत. अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान काही अनधिकृत बांधकामेही होती. ती पाडण्यात आल्याने कामांना वेग आला आहे. मार्च महिन्यापर्यंत विस्ताराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- प्रभात सहाय, एमआरव्हीसी-व्यवस्थापकीय संचालक.

Web Title: Harbor rail expansion to Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.