हार्बर रेल्वे रखडली
By admin | Published: April 16, 2016 02:45 AM2016-04-16T02:45:59+5:302016-04-16T02:45:59+5:30
हार्बरवर तांत्रिक समस्यांचा गोंधळ सुरूच असून, शुक्रवारी संध्याकाळी डाऊन दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर सेवा रखडली. मशीद स्थानकाजवळ ऐन गर्दीच्या
मुंबई : हार्बरवर तांत्रिक समस्यांचा गोंधळ सुरूच असून, शुक्रवारी संध्याकाळी डाऊन दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर सेवा रखडली. मशीद स्थानकाजवळ ऐन गर्दीच्या वेळी सव्वा तास घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.
सीएसटीहून पनवेलला जाणारी लोकल मशीद आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ येताच संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेचा खोळंबा झाला. मशीद स्थानकाजवळ बिघाड झाल्याने सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल जागीच थांबल्या. त्याचा परिणाम हळूहळू सीएसटीकडे येणाऱ्या लोकल सेवांवरही झाला. लोकलमधील तांत्रिक बिघाड हा संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला आणि लोकल सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात नेऊन ती रद्द करण्यात आली. त्यानंतर या लोकलला सानपाडा स्थानकात नेण्यात आले. हार्बवरील लोकल सेवा पूर्ववत केल्यानंतरही रात्री आठ वाजेपर्यंत लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. या गोंधळामुळे जवळपास १५ पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्या.
दरम्यान, चुनाभट्टी स्थानकात फाटक बंद होत एका रिक्षाने प्रवेश केला. त्यामुळे लोकल सेवेला फटका बसला. (प्रतिनिधी)