मुंबई-
हार्बर रेल्वेच्या पनवेल स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटीच्या दिशेनं येणारी वाहतूक तब्बल ४० ते ४५ मिनिटं उशीराने सुरू आहे. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना रखडपट्टीला सामोरं जावं लागत आहे.
पनवेल स्थानकात झालेला तांत्रिक बिघाडा दुरुस्त झाला असला तरी लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे. त्यात स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अर्ध्या तासाहून अधिक वेळ होऊनही लोकल येत नसल्यामुळे प्रवासी कामावर न जाता माघारी परतत आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर आधीच पाच दिवसांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरच्या कामासाठी हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आधीच प्रवाशांना ब्लॉकचा त्रास सहन करावा लागत असतानाच आजच्या तांत्रिक बिघाडाची त्यात भर पडली. या सर्वाचा मनस्ताप सहन करत चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहेत. त्यात कामावरही लेटमार्क लागत आहे.