हार्बर रेल्वेचा होतोय कायापालट
By admin | Published: February 15, 2016 03:15 AM2016-02-15T03:15:27+5:302016-02-15T03:15:27+5:30
जुन्या लोकल, अजूनही असलेला दुहेरी मार्ग आणि स्थानकांमध्येही नसलेल्या सुविधा असेच काहीसे चित्र असलेल्या हार्बर रेल्वेचा कायापालट केला जात आहे.
जुन्या लोकल, अजूनही असलेला दुहेरी मार्ग आणि स्थानकांमध्येही नसलेल्या सुविधा असेच काहीसे चित्र असलेल्या हार्बर रेल्वेचा कायापालट केला जात आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या
मेन लाइनवर बारा डबा लोकल धावत असतानाही, त्यापासून वंचित राहिलेल्या हार्बरवरही बारा डब्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या हार्बरवासीयांसाठी महत्त्वाचा असलेला बारा डबा प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून, या कामानंतर लोकल डब्यातील प्रवासी क्षमता वाढेल आणि सुकर प्रवास होण्यासही मदत मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या सीएसटी स्थानकात याच कामासाठी ७२ तासांचा विशेष ब्लॉक लवकरच घेतला जाईल व अन्य किरकोळ कामे पूर्ण करून एप्रिल महिन्यापासून बारा डबा लोकल धावेल... एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत सध्या हार्बरवर नऊ डबा असलेल्या लोकल बारा डबा करण्यासाठी, प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. या कामासाठी महत्त्वाच्या असलेल्या सीएसटी स्थानकात तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेऊन कामे केली जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्यात कामे करून एप्रिल महिन्यापासून बारा डबा लोकल धावण्यास सुरुवात होईल. बारा डबा लोकलमुळे ३0 टक्के प्रवासी क्षमता वाढणार आहे.
मध्य रेल्वेवरील हार्बरचा पसारा हा सीएसटीपासून पनवेल, अंधेरी आणि पनवेल ते अंधेरी असा आहे. हार्बरवरील पहिली लाइन कुर्ला ते रे रोड दरम्यान १२ डिसेंबर १९१0 रोजी सुरू झाली. त्यानंतर १९२५ च्या सुमारास हा मार्ग सीएसटीशी डॉकयार्ड रोड आणि सँडहर्स्ट रोड दरम्यान उन्नत (एलिव्हेटेड) मार्गांनी जोडला गेला. कालांतराने हार्बरचा विस्तार वाढतच गेला आणि त्यानंतर ठाणे-वाशी, पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्गही सुरू झाला. सध्या हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर दोनच मार्ग आहेत. हार्बरचा विस्तार होत असतानाच, मध्य रेल्वे मेन लाइनप्रमाणे मात्र मार्ग आणि लोकलचे डबे वाढविण्याचा विचार हार्बरवर झाला नाही. हार्बरवर बारा डबा लोकलही सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाला बरीच वर्षे लागली.
हार्बरवर १९२७ साली चार डबा लोकल धावली. त्यानंतर टप्प्याटप्यात त्याचे डबे वाढविण्याचे काम करण्यात आले, परंतु मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर नऊ डबावरून बारा डबा करण्यात आलेली पहिली लोकल १९८६ साली धावल्यानंतर या मार्गावरील सर्व बारा डबा लोकल २0११ पर्यंत पूर्ण झाल्या. हार्बरवर बारा डबा लोकल धावण्यास मात्र २0१६ साल उजाडले.
1रेल्वेचे केवळ दोनच मार्ग, बारा डबा लोकलची प्रतीक्षा, एसी-डीसीला लागणारा विलंब पाहता, हार्बरवासीय प्रवासी रेल्वेच्या महत्त्वाच्या सुविधांपासून अजूनही वंचित राहिलेले आहेत. असे असतानाच हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर अजूनही २५ वर्षे जुन्याच लोकल धावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा २७ लोकल हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एकूण १२१ लोकल्सपैकी ४६ लोकल या हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर धावतात.
2या ४६ लोकल्समध्ये ३६ हार्बरवर तर १0 ट्रान्स हार्बरवर लोकल धावत आहेत. मात्र, या ४६ लोकल्सधील २७ लोकल्स या जुन्या असून, त्यांचे आयुर्मान संपल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. २७ गाड्यांमध्ये १५ गाड्या डीसी-एसी परावर्तनावर धावणाऱ्या, नऊ गाड्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आणि तीन गाड्या रेट्रोफिटेड आहेत. २७ लोकल गाड्यांचे आयुर्मान २0११ मध्येच संपले आहे.