Join us  

हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:48 AM

आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कशी करणार, याची सविस्तर माहिती गोयल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५,९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असून, त्याचा फायदा येत्या आठ महिन्यात उत्तर मुंबईला देखील होणार आहे. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत असणाऱ्या हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली. 

बोरिवली पश्चिम एक्सर येथे रविवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत गोयल यांनी आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कशी करणार, याची सविस्तर माहिती दिली.

किनाऱ्यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास

उत्तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व गोराई-मनोरी, मढ, मार्वे आदी समुद्र किनारे लाभलेल्या स्थळांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास, तसेच या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स, खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करण्याचा प्रकल्प आदीबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भविष्यात १००० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :पीयुष गोयलहार्बर रेल्वेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेबोरिवली