नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून हार्बर रेल्वेमार्गावर बिघाड सत्र सुरूच असून, त्यामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला आहे. रविवारी सानपाडा-वाशी अप मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याने वाहतूक खोळंबली. दुरुस्तीसाठी बराच वेळ गेल्याने, या मार्गावरील वाहतूक सव्वा तास ठप्प झाली झाली. रेल्वे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी आरपीएफ जवानासोबत रेल्वे ट्रॅकची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले.सकाळी पावणेबारा वाजता वाशी-सानपाडा स्थानकांदरम्यान बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकल ठप्प झाल्या. सानपाडा-वाशीदरम्यान अडकलेल्या रेल्वे प्रवाशांनी या वेळी लोकल डब्यातून उड्या मारून पायी चालत वाशी स्थानक गाठले. या दरम्यान प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. संतप्त प्रवाशांनी पनवेल, सानपाडा रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. रेल्वेच्या रुळाला तडे जाणे आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना गेले कित्येक महिने त्रास सहन करावा लागत आहे. तासाभराच्या दुरुस्तीनंतर या मार्गावर लोकल सुरू करण्यात आल्या. नवी मुंबई प्रवासी संघटनेच्या वतीने अनेकदा तक्रार करून रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी व्यक्त केली. बॅटरी चोरीच्याही घटना वाढत असून, ओव्हरहेड वायर तुटल्याचे कारण सांगून अनेकदा प्रवाशांची दिशाभूल केली जात असल्याची प्रतिक्रिया धुरत यांनी व्यक्त केली.
रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत
By admin | Published: July 11, 2016 5:39 AM