Join us

हार्बरवर मिळणार ‘झटपट’ लोकल

By admin | Published: February 19, 2016 3:24 AM

हार्बर मार्गावर १२ डबा लोकल सुरू होत असतानाच येत्या काही वर्षांत कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम (सीबीटीसी)सारखी नवी सिग्नल यंत्रणाही बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकल सुरू होत असतानाच येत्या काही वर्षांत कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम (सीबीटीसी)सारखी नवी सिग्नल यंत्रणाही बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लोकल मार्गावर देशातील अशी पहिलीच यंत्रणा बसविण्यात येईल. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) ही योजना प्रस्तावित असून, सीएसटी ते पनवेल मार्गावर ती बसविण्याचे नियोजन असल्याचे एमआरव्हीसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्या धावणाऱ्या दोन लोकलमधील वेळा कमी होतील आणि हार्बरवासीयांना ‘झटपट’ लोकल मिळणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर आॅटो सिग्नल यंत्रणेबरोबरच ट्रॅक सर्किट यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र ही यंत्रणा हाताळताना रेल्वेला बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे नवी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. सध्या परदेशात रेल्वेमार्गांवर सिग्नलमधील सीबीटीसीसारखे उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येत असून, त्यामुळे एकामागोमाग ट्रेनच्या फेऱ्या होणे, ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणे आणि क्षमता वाढण्यास मदत मिळत आहे. याचा बराचसा फायदा होत असल्याने ही यंत्रणा मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च आहे. हार्बरवर नवी यंत्रणा बसविल्यास दोन लोकलमधील वेळ एक ते दोन मिनिटांनी कमी होईल, असे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. नवी यंत्रणा जरी बसविली तरी सध्याची सिग्नल यंत्रणा तशीच ठेवण्यात येईल. (प्रतिनिधी)हार्बर मार्गावर सीबीटीसीसारखी नवी सिग्नल यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. साधारण चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असून, प्राथमिक स्तरावरच प्रकल्प राबविण्यासंदर्भात चर्चा होत आहे. - प्रभात रंजन (एमआरव्हीसी प्रवक्ता)