मुंबई: एरवी तांत्रिक बिघाडांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या हार्बर रेल्वेमार्गावर सोमवारी रात्री गोंधळाचा नवा अध्याय लिहिला गेला. मोटरमनच्या चुकीमुळे हार्बरची लोकल चुकून पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर गेली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. परिणामी सध्या हार्बर रेल्वेची वाहतूक 20 मिनिट उशिराने सुरु आहे. येथील वडाळा रोड स्थानकावरून हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्गिका आहेत. मात्र, आज बेलापूर लोकलच्या मोटरमनने गाडी चुकून पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर नेली. वडाळा स्थानक सोडल्यानंतर प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. अखेर रेल्वे प्रशासनाला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर किंग्ज सर्कल स्थानकावर या गाडीतील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. या गोंधळाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मात्र, तोपर्यंत या साऱ्या गोंधळामुळे हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे प्रवाशी रेल्वेच्या कारभारावर चांगलेच संतापले.
हार्बर रेल्वेवर सावळागोंधळ; बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 11:27 PM