लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांच्या दिशेने बासरी भिरकवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपी ओंकारनाथ पांडे (६०) याला मंगळवारी सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तशी माहिती कुरार पोलिसांनी बुधवारी दिली.
ओंकारनाथ पांडे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. गेल्या वर्षी २ जानेवारी रोजी दिंडोशी सत्र न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पांडे वकिलांच्या वेशभूषेत अचानक त्याठिकाणी आला आणि ‘मी भगवान श्रीकृष्ण आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे आणि ज्यांनी माझ्यावर अन्याय केला ते न्यायालयात उपस्थित आहेत. वकील खटला लढवण्यासाठी खूप पैसे घेतात आणि क्लार्कदेखील प्रत्येक दस्तऐवजासाठी पैशांची मागणी करतात. त्यामुळे वकील होण्याचा विचार केल्याचे पांंडे याने सांगितले’. त्यानंतर त्याने न्यायाधीशांकडे पाहत बासरी वाजवीत त्यांच्या दिशेने ती भिरकावली. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, त्याला कुरार पोलिसांनी अटक केली.
अशोक पांडे याच्या मृत्यूप्रकरणी तो प्रमुख साक्षीदार होता. हे प्रकरण न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोशी सत्र न्यायालयात सुरू होते. पांडे सुनावणीला हजर नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध समन्स बजावण्यात आले आणि त्याला २ जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्याचदरम्यान हा प्रकार घडला. त्यानुसार दिंडोशी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंड ठोठावला.