कठोर परिश्रमातूनच मिळते निखळ यश, आयसीएसई, आयएससी परीक्षांमधील गुणवंतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 07:04 AM2020-07-11T07:04:26+5:302020-07-11T07:04:49+5:30
‘कठोर परिश्रमातूनच मिळते निखळ यश’, अशी प्रतिक्रिया या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी दिली.
मुंबई : सीआयएससीई म्हणजे काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात एकूण २२६ केंद्रांवर दहावीची तर ५१ केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ‘कठोर परिश्रमातूनच मिळते निखळ यश’, अशी प्रतिक्रिया या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी दिली.
या परीक्षेत अनेक विद्यार्थी उज्ज्वल यशाचे मानकरी ठरले. गोरेगावच्या विबग्योर शाळेची श्रद्धा माहेश्वरी दहावीत ९८.६% गुण मिळूवन शाळेतून दुसरी आली. डोंबिवली पूर्वच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलच्या रिया शेट्येला ९८.८% गुण मिळाले. तर, ठाण्याच्या बिलबॉन्ग हायस्कूलच्या प्रशांत चित्रवंशी याने ९९.२०% गुण मिळविले.
नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली - ख्वाईश बिल्लोरे
(दहावी - ९८.८%)
गोरेगाव पूर्वच्या विबग्योर ग्रुप आॅफ स्कूलच्या ख्वाईश बिल्लोरे हिने दहावीत ९८.८% मिळवून यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विषयांचा अभ्यास नियमित करत होते. अभ्यास करताना नियमित आणि एकाच पद्धतीने केल्याने माझी सर्व विषयांची तयारी पक्की झाली होती. मी उत्तम गुण मिळवेन, असा विश्वास मला होताच, तो खरा ठरल्याने आनंद होत आहे, असे ती म्हणाली.
प्रयत्नांचे फळ मिळाले - आरुषी अग्रवाल
(दहावी - ९८.८%)
मालाड पूर्वच्या विबग्योर स्कूलमधील आरुषी अग्रवाल दहावीत ९८.८% गुण मिळवून शाळेतून पहिली आली. इतक्या उत्तम गुणांसह शाळेत प्रथम येणे हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. माझ्या प्रयत्नांचे मला फळ मिळाले, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया आरुषीने दिली. शिक्षकांचे पूर्ण सहकार्य लाभले, सोबतच पालकांचीही मदत झाली, असे सांगून तिने सर्वांचे आभार मानले.
परदेशात शिकण्याची इच्छा - पासवी बुबना (९८.७५% )
कॅथड्रॉल अॅण्ड जॉन कॅनन स्कूलमधून पासवी बुबना हिला ह्युमॅनिटीजमध्ये ९८.७५% गुण मिळाले. घरात खूप आनंदाचे वातावरण असून पुढे स्कूल आॅफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये परदेशात शिकण्याची इच्छा तिने व्यक्त केली. मुळात कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग न लावत तिने हे यश मिळविल्याने तिचा विशेष अभिमान वाटत असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.