Join us

हार्दिक-जय यांचा झंझावात

By admin | Published: May 15, 2017 12:56 AM

हार्दिक तामोरे आणि जय बिस्ता या सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर मुंबई पोलीस सिटीरायडर्स संघाने मुंबई टी२० लीग स्पर्धे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हार्दिक तामोरे आणि जय बिस्ता या सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर मुंबई पोलीस सिटीरायडर्स संघाने मुंबई टी२० लीग स्पर्धेत धमाकेदार विजयाची नोंद करताना ठाणे मराठाज संघाचा १८१ धावांनी फडशा पाडला. या दोन्ही फलंदाजांनी २१५ धावांची विक्रमी सलामी देताना संघाचा विजय निश्चित केला होता. ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात ठाणे मराठाज संघाने नाणेफेक जिंकून मुंबई पोलीस संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. परंतु, हार्दिक - जय यांनी पहिल्या षटकापासून गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात करत ठाणेकरांचा निर्णय चुकीचा ठरवला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला जय केवळ ४ धावांनी शतक साजरा करण्यास चुकला. त्याने १४ चौकार व ४ षटकार ठोकून ९६ धावांची तुफानी खेळी केली. यानंतर हार्दिकने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना ठाणेकरांना मजबूत धुतले. त्याने ९ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडताना ११३ धावांची वादळी खेळी केली. या दोघांच्या जोरावर पोलिसांनी निर्धारित २० षटकांत २ बाद २८२ धावांचा एव्हरेस्ट उभारून ठाणेकरांना प्रचंड दबावाखाली आणले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ठाणेकर सपशेल अपयशी ठरले. प्रसाद पाटील (३/३७), शिवम दुबे (२/१०), राकेश प्रभू (२/२०) आणि नीरज सिंग (२/२८) यांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर पोलिसांनी ठाणेकरांना केवळ १०१ धावांमध्ये गुंडाळून तब्बल १८१ धावांनी एकतर्फी बाजी मारली. ठाणे संघाकडून सिद्धार्थ अग्निहोत्री (३०) व उमेश गुज्जर (२४) यांनी झुंज देण्याचा अपयशी प्रयत्न केला.