‘सूर ज्योत्स्ना’चे राष्ट्रीय संगीत पुरस्कार जाहीर; हरगून कौर, प्रथमेश लघाटे विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 03:16 AM2021-02-10T03:16:35+5:302021-02-10T08:37:10+5:30
मान्यवरांच्या उपस्थितीत १६ फेब्रुवारीला रंगणार सोहळा
मुंबई : सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने भारतीयांवर जादू करणारी हरगून कौर व लहान वयातच स्वत:च्या गायकीने वेगळी ओळख निर्माण करणारा प्रथमेश लघाटे हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२०चे विजेते ठरले आहेत.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२०’चे वितरण मंगळवार, १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे.
सायन येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांत या मंचाने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा असा मंच आहे ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबतच संगीताचे क्षेत्र विस्तारण्यास मोलाचे योगदान दिले आहे. मागच्या सहा वर्षांत या पुरस्काराने अवघ्या देशात स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.
हरगून कौर
हरगूनचा जन्म अमृतसरमधला. इंडियाज गॉट टॅलेंटच्या पाचव्या सीजनमध्ये ती अंतिम फेरीत होती. २०१९मध्ये द व्हॉइस कार्यक्रमातही ती अंतिम फेरीतील स्पर्धक होती. या कार्यक्रमात ए. आर. रेहमान यांनी तिचा ‘जय हो’ परफॉर्मर म्हणून गौरव केला. व्हॉइस ऑफ पंजाबच्या चौथ्या सिजनची अंतिम फेरी तिने गाठली होती. या कार्यक्रमात गायिका आशा भोसले यांनी तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी तिने राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट हार्मोनियम वादक पुरस्कार पटकावला. ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटासाठी तिने पार्श्वगायनदेखील केले आहे. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कारही मिळाला. हिंदी-मराठीसोबतच पंजाबी, इंग्रजी, गुजराती, तेलगू या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ती एक गीतकारही आहे.
प्रथमेश लघाटे
प्रथमेशचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली इथला. त्याने वयाच्या चौथ्या वर्षापासून गायन व तबला वादनाला सुरुवात केली. काकांच्या भजनी मंडळामुळे लहानपणापासूनच त्याला संगीताची गोडी लागली. लहानपणापासूनच तालुका व जिल्हास्तरीय गायन स्पर्धांमध्ये त्याने अनेक बक्षिसे पटकावली. २००३ पासून चिपळूण येथे सतीश कुंटे व वीणा कुंटे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले. २००८ मध्ये सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली. या संपूर्ण स्पर्धेत ५१ वेळा सर्वोत्तम ‘नि’ मिळविणारा तो एकमेव स्पर्धक ठरला. आतापर्यंत त्याला शाहू मोडक पुरस्कार, विश्वनाथ बागुल पुरस्कार, कोकण गंधर्व पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, अनिल मोहिले स्मृती पुरस्कार, पुणे भारत गायन समाजाचा २०१८ सालचा बालगंधर्व अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. करुणेच्या सागरा हा त्याचा पहिला सोलो अल्बम प्रकाशित झाला. सध्या त्याचे प्रथम स्वर, मर्मबंधातली ठेव व पंचतत्त्व हे कार्यक्रम सुरू आहेत.
विशेष आकर्षण - तरुण गायकांची संगीतमय मेजवानी
यंदाच्या सातव्या सांगीतिक पर्वात आर्या आंबेकर, पूजा गायतोंडे, अंकिता जोशी, एस आकाश, शिखर नाद कुरेशी, ओझस अढिया आणि रमाकांत गायकवाड या तरुण गायकांची संगीतमय मेजवानी हे विशेष आकर्षण असणार आहे..
दिग्गजांचा सत्कार
या सोहळ्यात आनंदजी, पं. अजय पोहनकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, हरिहरन, पं. शशी व्यास, रुपकुमार राठोड, कैलाश खेर ह्या संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड
गायक रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा तसेच टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवरांनी सातव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. याआधीच्या विजेत्यांची निवड पं. जसराज, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, डॉ. एल. सुब्रम्हण्यम, शंकर महादेवन, पं. हरिप्रसाद चौरासिया या मान्यवरांनी केली होती.
यापूर्वीच्या पुरस्काराचे मानकरी
२०१४ गायिका - रिवा रूपकुमार राठोड, गायक - अर्शद अली खान
२०१५ गायिका - पूजा गायतोंडे, तबला वादक - ओजस अढिया
२०१६ गायिका - अंकिता जोशी, बासरी वादक - एस आकाश
२०१७ गायिका - स्वयंमदूती मजुमदार, गायक - रमाकांत गायकवाड
२०१८ गायिका - अंजली गायकवाड, शास्त्रीय गायक - ब्रजवासी ब्रदर्स
२०१९ गायिका - आर्या आंबेकर, गायक - शिखर नाद कुरेशी
विनामूल्य पाससाठी संपर्क साधा
या सोहळ्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. विनामूल्य पासेससाठी ८१०८४ ६९४०७ या क्रमांकावर आपले नाव पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.