हरिद्वार सुपरफास्ट धावणार
By admin | Published: July 4, 2017 05:21 PM2017-07-04T17:21:30+5:302017-07-04T17:21:30+5:30
हरिद्वार येथे ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या बहिराणा या सिंधी बांधवांच्या पवित्र धार्मिक उत्सवासाठी मुंबईहून जाणाऱ्या हजारो सिंधी भाविकांना ६, १० आणि १३ जुलै रोजी
Next
>ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 04 - हरिद्वार येथे ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या बहिराणा या सिंधी बांधवांच्या पवित्र धार्मिक उत्सवासाठी मुंबईहून जाणाऱ्या हजारो सिंधी भाविकांना ६, १० आणि १३ जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून हरिद्वारला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेने रद्द केल्यामुळे भाविकांना धक्का बसला होता. गेल्या काही महिन्यांआधी आरक्षण करणाऱ्या भाविकांना या पवित्र उत्सवात सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हस्तक्षेप करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर पर्यायी मार्गाने ६, १० आणि १३ जुलै रोजी ही रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बहिराणा हा सिंधी भाविकांचा पवित्र उत्सव असून ७ जुलैपासून हरिद्वार येथे त्याची सुरुवात होत आहे. देशभरातून लाखो सिंधी भाविक त्यासाठी हरिद्वार येथे जमा होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही उल्हासनगरसह मुंबई परिसरातून हजारो भाविक हरिद्वारला जाणार आहेत. त्यासाठी ६, १० आणि १३ जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस - हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेसचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, मीरत जवळ दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या रद्द झाल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने हरिद्वार एक्सप्रेस देखील रद्द केल्याने सिंधी भाविक अडचणीत सापडले होते. हरिद्वारला जाण्याचा अन्य कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या उत्सवात सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी खा. डॉ. शिंदे यांच्याकडे धाव घेऊन अडचण सांगितली असता खा. डॉ. शिंदे यांनी त्वरित रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला. श्री प्रभू यांचे खासगी सचिव अनंत स्वरूप यांना भाविकांची अडचण सांगितली आणि पर्यायी मार्गाने ही गाडी चालवण्याची विनंती केली. त्यानुसार, ६, १० आणि १३ जुलै रोजी मीरत ऐवजी शामली मार्गे ही गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. रद्द केलेली गाडी पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही या गाड्यांची तिकिटे दिली जात नव्हती. त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी संपर्क साधून त्वरित सिस्टिम अपडेट करून प्रवाशांना तिकिटे देण्याची सूचना केली.