मुंबई मेट्रोचे पुनश्च हरिओम, ५० टक्के फेऱ्यांसह उद्यापासून धावणार, मोनो आजपासून सेवेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:34 AM2020-10-18T11:34:09+5:302020-10-18T11:35:47+5:30
सोमवार, १९ आॅक्टोबरपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ५० टक्के फेऱ्यांसह मेट्रो धावेल. मुंबई मेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सकाळी ८.३० वाजल्यापासून मुंबईची मेट्रो धावू लागेल. मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.(Mumbai Metro)
मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल सहा महिन्यांनी पुनश्च हरिओम अंतर्गत रविवारी मोनो आणि सोमवारी मुंबईमेट्रो धावू लागेल. मोनो आणि मेट्रोरेल्वे रुळावर आल्याने मुंबईचा वेग वाढेल, असा दावा केला जात असून, रेल्वेवर पडणारा प्रवाशांचा भारही कमी होईल.
सोमवार, १९ आॅक्टोबरपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ५० टक्के फेऱ्यांसह मेट्रो धावेल. मुंबई मेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सकाळी ८.३० वाजल्यापासून मुंबईची मेट्रो धावू लागेल. मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अस्वस्थ वाटत असल्यास किंवा आवश्यकता नसल्यास मेट्रोने प्रवास करू नये. ६५ वर्षांवरील आणि १० वर्षांखालील प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावर मोनोरेल रविवारपासून चालविण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे मोनोरेलमध्ये सर्वांना प्रवेश असेल. तत्पूर्वी शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मोनोरेल सुरू करण्यापूर्वीच्या कामांची पाहणी केली.
राजीव यांनी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा मोनोरेलने प्रवासदेखील केला. क्यूआर स्कॅनिंगची पाहणी करून प्रवासावेळी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केली.
मेट्रो प्रवासासाठी या नियमांचे पालन गरजेचे
गर्दीच्या वेळी प्रवास टाळावा. कोविडची लक्षणे असलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. मेट्रोसह स्थानकांवर मास्क घालणे अनिवार्य आहे. प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे. सामाजिक अंतर पाळावे. मेट्रोमध्ये जास्त साहित्य आणि धातूच्या वस्तू घेऊन जाऊ नये. प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, क्यूआर तिकिटे आणि मोबाइल तिकिटे वापरा. आरोग्य सेतूचा वापर करा, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.
अशी धावेल मुंबई मेट्रो
च्मेट्रो सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत धावेल. सेवा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर प्रवेशद्वार खुले केले जाईल.
च्मेट्रो सेवा बंद होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर प्रवेशद्वार बंद केले जाईल. रोज २०० फेºया होतील.
- गर्दीच्या वेळी दर साडेसहा मिनिटांनी तर गर्दी नसलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेस्ल.
- प्रत्येक फेरीत ३०० प्रवासी प्रवास करू शकतील. वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील प्रत्येक स्थानकावर मेट्रो थांबण्याच्या कालावधी हा आता २० ते ४० सेकंदांनी वाढविल्याने मेट्रोत सहज आत जाता येईल.
- प्लॅस्टिक टोकनऐवजी कागदाचे तिकीट देण्यात येईल.
- स्मार्टकार्डमध्ये मार्चपूर्वी जर शिल्लक पैसे असतील तर आता त्यांचा उपयोग तिकिटासाठी होईल.