मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 01:13 AM2021-01-01T01:13:26+5:302021-01-01T06:56:36+5:30

आवाज फाउंडेशनने कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील रहिवासी आणि व्यावसायिक भागातील आवाजाची पातळी मोजली होती.

Hariom of Noise Pollution in Mumbai | मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील ध्वनिप्रदूषणात कमालीची घट पाहायला मिळाली होती. मात्र, पुनश्च हरिओम म्हणत सरकारने हळूहळू निर्बंध शिथिल केले आणि जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. साेबतच ध्वनिप्रदूषणाची पातळीही वाढू लागली. लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने आवाजाची पातळी ४१.७ ते ६६ डेसिबल दरम्यान होती. मात्र, अनलॉकमध्ये रस्त्यांवर वर्दळ वाढू लागल्याने ती ६४.६ ते ९५.६ डेसिबलपर्यंत वाढली.

आवाज फाउंडेशनने कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील रहिवासी आणि व्यावसायिक भागातील आवाजाची पातळी मोजली होती. मुंबईतील वांद्रे, एसव्ही मार्ग, दादर आणि मोहम्मद अली मार्ग या परिसरांमध्ये लॉकडाऊन व अनलॉक काळातील आवाजाची पातळी मोजण्यात आली. डिसेंबर महिन्यात मुंबईतील ध्वनिप्रदूषणाची पातळी ९५.६ डेसिबलपर्यंत वाढली असली, तरी लॉकडाऊन आधीच्या १०५ डेसिबलपेक्षा ती कमीच असल्याचे नोंदविले गेले.

मुंबईतील वाहतूक हीच ध्वनिप्रदूषणास कारणीभूत असल्याचे २०१८च्या नीरी अहवालात नमूद आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईतील रस्त्यांवरची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. मात्र, अनलॉकमध्ये नियम व अटी शिथिल केल्याने मुंबईतील रस्ते पुन्हा वाहनांनी गजबजू लागले. यामुळे ध्वनिप्रदूषण वाढले.

आवाज किती असावा?

नागरी वस्ती, सार्वजनिक ठिकाणी आणि औद्योगिक परिसरात आवाजाची पातळी किती असावी, हे पर्यावरण संरक्षण कायद्याने निश्चित केले आहे. त्यानुसार, सायलेन्स झोनमध्ये ५० डेसिबल, निवासी झोनमध्ये ५५ डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ६५ डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबलपेक्षा कमी ध्वनिपातळी राखणे आवश्यक आहे.

Web Title: Hariom of Noise Pollution in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.