हरिश्चंद्र पाटील यांचे निधन

By Admin | Published: May 2, 2016 12:51 AM2016-05-02T00:51:20+5:302016-05-02T00:51:20+5:30

माजी आमदार व माजी महापौर तसेच मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील (वय ६२) यांचे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा

Harishchandra Patil passed away | हरिश्चंद्र पाटील यांचे निधन

हरिश्चंद्र पाटील यांचे निधन

googlenewsNext

कल्याण : माजी आमदार व माजी महापौर तसेच मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील (वय ६२) यांचे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा माजी नगरसेवक हर्षद आणि निषाद तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डोंबिवली पूर्वेकडील चोळेगाव परिसरातील स्मशानभूमीत पाटील यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील हे किडनीच्या विकाराने आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर डोंबिवलीतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली.
महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, शिक्षक
आमदार रामनाथ मोते, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार रमेश पाटील, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे, काँग्रेसचे माजी शिक्षण मंडळ उपसभापती अमित म्हात्रे, केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे, माजी उपमहापौर राहुल दामले यांच्यासह केडीएमसी आयुक्त ई रविंद्रन,
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
निवासस्थानी पार्थिव आणल्यानंतर अग्निशमन आणि सुरक्षारक्षक दलाच्यावतीने
मानवंदना देण्यात आली.
यावेळी महापौर देवळेकर आणि आयुक्त रवींंद्रन यांच्या वतीने पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आले.

ठाकुर्लीत उत्स्फूर्त बंद
पाटील यांच्या निधनामुळे त्यांचे निवासस्थान असलेल्या ठाकुर्लीत रविवारी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा वाजता सर्वेश सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे.

लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केडीएमसीच्या वतीने रविवारी तीन नव्या रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार होते. परंतु हरिश्चंद्र पाटील यांचे निधन झाल्याचे समजताच कार्यक्रम रद्द करून लोकार्पण सोहळा तूर्त पुढे ढकलला आहे.
शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीतील स. वा.जोशी विद्यालयात होणारा सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.

नगरसेवक ते महापौर देदीप्यमान कारकिर्द
डोंबिवली नगरपालिकेचे नगरसेवक, कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यासह महापौरपद आणि त्यानंतर कल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशी हरिश्चंद्र पाटील यांची एकंदरीत ४० वर्षाची कारकीर्द देदीप्यमान अशीच होती.
१९७४ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक म्हणून डोंबिवली नगरपालिकेवर निवडून आले. यानंतर त्यांनी शेकापचे कृष्णराव धुळप यांच्याबरोबर जनसंघात प्रवेश केला. काही कालावधीनंतर धुळप पुन्हा स्वगृही परतले. परंतु पाटील जनसंघातच राहिले. पुढे कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर विरोधी पक्षनेते, सभागृहनेते ही पदे भूषविली.
१३ एप्रिल २००३ मध्ये त्यांची महापौरपदी निवड झाली. २००५ पर्यंत अडीच वर्ष ते महापौर होते. त्याच कालावधीत २००४ मध्ये ते कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. महापौर आणि आमदार अशी दोन्ही पदे त्यांनी एकत्रित भूषविली होती. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जायचे. दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेमध्ये पक्षात प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे मनसे कल्याण पूर्व जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

मार्गदर्शक हरपला
डोंबिवली नगरपालिकेचे नगरसेवक, केडीएमसीचे महापौर आणि त्यानंतर आमदार अशी त्यांची कारकिर्द वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला.
- रवींंद्र चव्हाण,
आमदार, डोंबिवली

त्यांच्या अंगी
दातृत्वाची भावना
हरीश्चंद्र पाटील हे त्यांच्या नावाप्रमाणेच राजा हरिश्चंद्रासारखे होते. त्यांच्यामध्ये दातृत्वाची भावना होती. यातून ते सतत इतरांना मदत करीत राहीले. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे
- जगन्नाथ पाटील,
माजी मंत्री

निर्भीड व्यक्तिमत्त्व
पाटील यांच्या निधनाने जुना सहकारी गमावला. आपली भूमिका सडेतोड मांडणारे निर्भिड व्यक्तीमत्व पाटील यांच्या रूपाने आपल्यातून निघून गेले. - रामनाथ मोते, शिक्षक आमदार

सच्चा आणि नि:स्वार्थी कार्यकर्ता हरपला
नि:स्वार्थी आणि सच्चा कार्यकर्ता असे पाटील यांचे व्यक्तीमत्व होते. यांच्या निधनामुळे
एक जवळचा मित्र गेला.
- चंद्रकांत माने, केडीएमसी, माजी सचिव

प्रशासकीय कामाचे जाणकार
जमिनीवर पाय असलेला कार्यकर्ता कल्याण डोंबिवलीने गमावला. पाटील यांना प्रशासकीय कामकाजाची चांगली जाण होती.त्यांना २००४मध्ये त्यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाने अतोनात परिश्रम घेतले होते.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी

Web Title: Harishchandra Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.