Join us  

दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 22, 2017 8:25 AM

‘ऑपरेशन मुंब्रा’ केला तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 -  मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार हा प्रश्न उरतोच. खबरी मिळाल्यावर तर धरपकडी होणारच, पण त्याहीपेक्षा आता ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय आहे असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. 
 
‘ऑपरेशन मुंब्रा’ केला तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.  इस्लामी दहशतवाद आणि मुंब्रा हे कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे. अर्थात, त्यात तसे नवीन काही नाही. मात्र ‘इसिस’ या खतरनाक संघटनेच्या दहशतवाद्यांना तेथून पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याने हे कनेक्शन अत्यंत धोकादायक वळणावर आले आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुंब्य्राचे सर्वच मुस्लिम बांधव देशविरोधी कारवायांत सहभागी आहेत असे नाही, पण तरीही मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे ही वस्तुस्थिती आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
‘इसिस’चा कट उधळला - 
देशात मोठा घातपात घडवण्यासाठी दहशतवाद्यांची साखळी तयार करणाऱ्या मुंब्य्रातील मुख्य सूत्रधारासह चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार आणि पंजाब एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत इसिसचा मोठा कट उधळला गेला.
मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला मूख्य सूत्रधार नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील रहिवासी असून, तो इसिसच्या वतीने दहशतवादी कारवायांसाठी नवीन तरुणांना सहभागी करून घेण्याचे काम करत असे. त्यासाठी त्याने १० ते १२ जणांचा एक ग्रुप बनविला आहे. दहशतवादी संघटनेसाठी पैसे पुरविणे, त्याची माहिती गोळा करणे तसेच अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तो करायचा. गेल्या वर्षभरापासून तो मुंबई परिसरात राहत आहे. मुंब्रा येथील देवरीपाडा येथील अक्रम मंजिल इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर तो भाड्याने राहायचा. तो राहत असलेला फ्लॅट शेहजाद अख्तर यांच्या मालकीचा आहे. त्याच्यासोबत गुलफाम आणि उजैफा अबरार हे ५ एप्रिलपासून राहण्यास आले होते. ते दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नजीम शेजारच्यांना देत असे. उमर या टोपणनावाने तो अन्य साथीदारांसोबत बोलत होता. नजीम याच्याकडून एक लाख ६५ हजार ३५० रुपयांची रोकड आणि मोबाइल हस्तगत करण्यात आले.