प्रादेशिक स्तरानुसार सर्पदंश प्रतिकारक लसी हव्यात, हिम्मतराव बावस्कर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:16 AM2018-08-12T03:16:42+5:302018-08-12T03:17:05+5:30
प्रत्येक प्रजातीचा सर्पदंश वेगळा असतो, त्यामुळे होणारा त्रासही वेगळा असतो. राज्यातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या विषाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात.
मुंबई - प्रत्येक प्रजातीचा सर्पदंश वेगळा असतो, त्यामुळे होणारा त्रासही वेगळा असतो. राज्यातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या विषाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. म्हणूनच प्रादेशिक स्तरानुसार वेगवेगळ्या सर्पदंश प्रतिकारक लसी तयार करण्याची गरज आहे, असे मत डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी व्यक्त केले.
परळ येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचा ११९वा स्थापना दिन सोहळा शुक्रवारी दिमाखात पार पडला. या वेळी ‘सर्पदंश व उपचार’ या विषयावर हिम्मतराव बावस्कर बोलत होते. याप्रसंगी हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक, कार्यक्रम अध्यक्ष पद्मभूषण डॉ. आर.डी. लेले आदींची उपस्थिती होती.
मण्यार, नाग, घोणस आणि फुरसे या चार सर्पांच्या जाती विषारी आहेत. सर्पदंश झाल्यावर रुग्णांना त्वरित सरकारी रुग्णालयात दाखल करावे. देशभरात दरवर्षी ५० हजार लोक सर्पदंशाने मृत्यू पावतात व त्यामध्ये राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती डॉ. बावस्कर यांनी या वेळी दिली.
हाफकिन संस्थेच्या वतीने नुकतीच शाळकरी मुलांसाठी ‘साप : शत्रू की मित्र’ या विषयावर निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन केले होते. ही स्पर्धा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये घेण्यात आली. निबंध स्पर्धेमधील इंग्रजी भाषेच्या पहिल्या गटात केतकी पड्याल हिने, तर मराठी गटात केतकी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. इंग्रजी गट दोनमध्ये सानिका देशमुख प्रथम, तर अभिक्रांत ढेपे याला विशेष पुरस्कार देण्यात आला. मराठी गट दोनमध्ये रुचा चितळे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. इंग्रजी भाषिक घोषवाक्य स्पर्धेत सिद्धी मयेकर प्रथम क्रमांक, तर मराठीत आकांक्षा गायकवाड प्रथम आणि विजय ढापसे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
दरम्यान, स्वच्छ गार्डन स्पर्धेमध्ये प्रकाश कळसूलकर आणि राजू गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. विभाग साफसफाई स्पर्धेमध्ये अमोल गायकवाड, संतोष गुरव यांना गौरविण्यात आले. वार्षिक अहवाल तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक अम्रीतपाल कौर हुंजन, द्वितीय अमिता पाटील आणि तृतीय क्रमांक सम्राट मोरे यांना प्राप्त झाला. तसेच प्राजक्ता माने आणि सृष्टी मुंबईकर यांनाही या वेळी गौरविण्यात आले.
महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंश
मण्यार, नाग, घोणस आणि फुरसे या चार सर्पांच्या जाती विषारी आहेत.
देशभरात दरवर्षी ५० हजार लोक सर्पदंशाने मृत्यू पावतात व त्यामध्ये राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे.