आरोग्यदायी संक्रांत!
By admin | Published: January 12, 2017 06:03 AM2017-01-12T06:03:20+5:302017-01-12T06:03:20+5:30
संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीने खातो. तीळ आणि गूळ हे पदार्थ
वैद्य श्याम नाबर
संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीने खातो. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठी ते पूर्वापार आपल्या आहारात असावेत, असे सांगितले आहे. आयुर्वेदासारख्या पुरातन शास्त्रातही तिळाचे महत्त्व सांगितले आहे.
थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, आयर्न आणि कॉपरसह अनेक खनिजे असतात. तीळ खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीआॅक्सिडंट आपल्या मेंदूवर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही. वृद्धापकाळात स्मरणशक्ती कमी होत जाते. त्यामुळे तिळाचे रोज सेवन केल्यास मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
सौंदर्य उपायातही तिळाचा वापर केला जातो, आंघोळीपूर्वी तिळाचे तेल लावल्यास त्वचा फुटण्याचे प्रमाण कमी होते. तिळातील स्निग्धपणा त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतो. तर तिळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमसारख्या तत्त्वामुळे हाडे मजबूत होतात. दिवसात एक चमचा तीळ खाल्ल्यास दात मजबूत होतात. तिळात फायबर आणि अॅँटीआॅक्सिडंट असल्याने प्रतिकारक्षमता वाढते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढत नाही.
तीळगुळाच्या लाडूंमध्ये वापरला जाणारा गूळही औषधी असतो. गूळ हा शरीराला हलकेपणा आणतो, पचायला हलका, पथ्यकर, पित्तवातनाशक आणि रक्त शुद्ध करणारा आहे. गूळ हा मधुर चवीचा असल्याने शरीराचे बल वाढवितो. गुळाचा अतिप्रमाणात उपयोग केल्यास पोटात कृमी होणे, नाकातून घोळणा फुटणे, तोंड येणे, हिरड्या सुजणे अशा तक्रारी होतात. गूळ आणि दाणे यांचा संयोग हे एक उत्तम टॉनिक आहे. तसेच तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्यास ते फलदायक ठरते. तीळ शक्तिवर्धक असून बद्धकोष्ठता, मूळव्याध, सूज येणे, किडनी विकार, वात, पोटातील अल्सर अशा अनेक व्याधींवर तीळ आणि तिळाच्या तेलाचा प्राथमिक उपचार म्हणून वापर केला जातो. तसेच, तिळात तंतुमय पदार्थांचा समावेश असल्याने वेट लॉसच्या डाएट प्लानमध्ये त्याचा समावेश करता येईल. तिळात झिंक असते, त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होण्यास मदत होते.
लेखक आयुर्वेदिक चिकित्सक आहेत.