मुंबई - मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश तात्काळ काढा, या मागणीसाठी जाधव यांनी मंत्रालयाशेजारी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मात्र, राज्यभरातील आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ हर्षवर्धन जाधव यांनी ठिय्या आंदोनल सुरु केले होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश तात्काळ काढा, अशी मागणी करत त्यांनी आज दुपारी 12 वाजता मंत्रालयाजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्या पार्श्वभूमीवर जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीसाठी ते मुंबईत आले होते. मात्र, औरंगाबाद येथील आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची बातमी कळताच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कार्यालयाशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.