टॅक्सी चालवताना हार्टअटॅक, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू तर ३ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:25 AM2017-11-16T02:25:22+5:302017-11-16T02:25:31+5:30
टॅक्सी चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाने गाडी थेट पदपथावर चढवली. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर पदपथावर बसलेले ३ जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना माहीममध्ये बुधवारी सायंकाळी घडली.
मुंबई : टॅक्सी चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाने गाडी थेट पदपथावर चढवली. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर पदपथावर बसलेले ३ जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना माहीममध्ये बुधवारी सायंकाळी घडली. राजपती सूरज दुबे (५७) असे चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनीत दुबे राहत होता. सकाळी तो नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. बुधवारी सायंकाळी ७ वाजता पॅराडाईज सिनेमा येथील पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून तो पुढे निघाला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. अन्य वाहनांना धडक देत त्याने गाडी थेट तेथील पदपथावर चढवली. यामध्ये तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. यामध्ये राजेंद्र कुमार मेमन गंभीर जखमी झाले आहेत.