Join us

स्वस्त घराच्या नादात गमावली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 3:07 AM

स्वस्त घराच्या नादात मानखुर्दच्या फिटनेस ट्रेनरवर शेती गमावण्याची वेळ ओढावली. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याऐवजी तक्रारदाराकडे उलटतपासणी सुरू आहे.

मुंबई : स्वस्त घराच्या नादात मानखुर्दच्या फिटनेस ट्रेनरवर शेती गमावण्याची वेळ ओढावली. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याऐवजी तक्रारदाराकडे उलटतपासणी सुरू आहे.मानखुर्द महाराष्ट्र नगर परिसरात अजित शेडकर (३९) हे कुटुंबासह राहतात. दोन वर्षांपूर्वी तेथीलच संदीप पाटसुटेसोबत त्यांची ओळख झाली. त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. यात त्याची आई शारदाही सहभागी होती. संदीपने त्याला अवघ्या ८ लाख रंपयांत म्हाडामध्ये घर देण्याचे आमिष दाखवले. त्याला बळी पडून शेडकरने २०१६ मध्ये शेती विकली व अडीच लाख रुपये संदीपला दिले.दरम्यान संदीपने शेडकरने म्हाडाचा अधिकारी असल्याची बतावणी करत अर्जून भोसलेची त्याच्या सोबत ओळख करुन दिली. त्याच्याकडे म्हाडाचे ओळखपत्रही होते. त्यामुळे शेडकरचा विश्वास बसला. त्याने संदीपला पैसे दिले. मात्र त्याला दाखविण्यात आलेल्या घरात दुसरीच व्यक्ती राहण्यास असल्याचे शेडकरच्या नंतर लक्षात आले. संदीपकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तो पसार झाल्याचे शेडकरने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासंदर्भातील त्याने मानखुर्द पोलिसात तक्रार केली.सहा महिन्यानंतर ७ मार्च रोजी मानखुर्द पोलिसांनी संदीप, आई शारदा आणि अर्जून भोसलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप कारवाई केली नसल्याचे शेडकरचे म्हणणे आहे. याउलट आरोपींना पकडण्याऐवजी मानखुर्द पोलिसांनी त्याने पैसे कुठून व कसे दिले याबाबत बुधवारी उलटतपासणी सुरू केली. अनेकांना या त्रिकुटाने गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. सहा ते सात जणांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत. मात्र, पोलीस आरोपींना पकडण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेडकरने केला.